महूदमध्ये भाई गणपतराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त सेवाभावी उपक्रमांचा जागर २५३ रुग्णांची मोफत आरोग्य तपासणी; १२१ ग्रामस्थांना आयुष्यमान कार्ड, विद्यार्थ्यांना ३५०० खाऊ पाकिटांचे वाटप
महूद : सांगोला तालुक्याचे भाग्यविधाते तथा ज्येष्ठ आमदार स्वर्गीय भाई डॉ. गणपतराव देशमुख (आबासाहेब) यांच्या ९९व्या जयंतीनिमित्त
महूद येथे विविध सामाजिक व सेवाभावी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.
शेतकरी कामगार पक्ष व पुरोगामी युवक संघटनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमांना महूदसह पंचक्रोशीतील ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
जयंतीनिमित्त मोफत आरोग्य तपासणी, मूत्ररोग व मुतखडा तपासणी तसेच आयुष्यमान कार्ड नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
दक्षता हॉस्पिटल व लोकप्रिय आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख मेडिकल फॅकल्टी यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर पार पडले.
या शिबिरात तज्ज्ञ डॉक्टरांनी तब्बल २५३ रुग्णांची तपासणी करून त्यांना आवश्यक उपचार व आरोग्यविषयक मार्गदर्शन केले.
गरजू रुग्णांना पुढील उपचार तसेच शस्त्रक्रियेसंदर्भातही मार्गदर्शन करण्यात आले.
दरम्यान, प्रधानमंत्री आयुष्यमान भारत योजना व महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या माध्यमातून १२१ ग्रामस्थांचे मोफत आयुष्यमान कार्ड काढून देण्यात आले.
त्यामुळे आर्थिकदृष्ट्या गरजू नागरिकांना मोठा दिलासा मिळाला.
शिबिराचे उद्घाटन सांगोला तालुक्याचे आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या हस्ते स्वर्गीय आबासाहेबांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले.
यावेळी आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी स्व. आबासाहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
या कार्यक्रमास महूद पंचक्रोशीतील आजी-माजी जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य, सरपंच, उपसरपंच, सोसायटीचे पदाधिकारी,
विविध संस्थांचे पदाधिकारी, पुरोगामी युवक संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दक्षता हॉस्पिटलच्या वतीने डॉ. निरंजन केदार, डॉ. ऐश्वर्या कारंडे, डॉ. सुमित विभुते, नर्सिंग स्टाफ, अमर चव्हाण तसेच धनराज ॲम्बुलन्सचे सचिन चांदणे आदींनी शिबिरासाठी सहकार्य केले.
याचबरोबर शेतकरी कामगार पक्ष व पुरोगामी युवक संघटनेच्या वतीने महूद चौकात नागरिकांना लाडू वाटप करण्यात आले.
महूद बुद्रुक परिसरातील शाळा, महाविद्यालये तसेच वाड्या-वस्त्यांवरील विद्यार्थ्यांना व शिक्षकांना तब्बल ३५०० खाऊ पाकिटांचे वाटप करण्यात आले.
स्वर्गीय भाई गणपतराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या आरोग्यसेवा, आयुष्यमान कार्ड व खाऊ वाटपाच्या
सामाजिक उपक्रमांचे नागरिकांकडून कौतुक होत आहे. सामाजिक बांधिलकी जपत जयंती साजरी करण्याचा हा उपक्रम प्रेरणादायी असल्याचे मत व्यक्त होत आहे.
— भाई चंद्रकांत सरतापे यांनी दिलेल्या माहितीनुसार


0 Comments