सांगोला बंद घरांवर चोरट्यांची नजर; दोन घरफोड्यांत ९.४० लाखांचा ऐवज लंपास आगलावेवाडी, मेडशिंगी येथे दागिने व रोकड चोरी; ग्रामीण भागात भीतीचे वातावरण
सांगोला / प्रतिनिधी : घरातील व्यक्ती बाहेर गेल्याची संधी साधत चोरट्यांनी बंद घरांना लक्ष्य करण्याचा सपाटा लावला आहे. सांगोला तालुक्यातील आगलावेवाडी (जवळा) आणि मेडशिंगी येथे झालेल्या दोन स्वतंत्र घरफोड्यांमध्ये
सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रकमेसह तब्बल ९ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला. सलग घडलेल्या या घटनांमुळे ग्रामीण भागातील नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
आगलावेवाडीत सेवानिवृत्त कर्मचाऱ्याचे घर फोडले
आगलावेवाडी येथे विठोबा साउबा गवंड (वय ७४) यांच्या बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी ३ लाख ६५ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. गवंड हे मुंबई महानगरपालिकेच्या सेवेतून २०११ मध्ये सेवानिवृत्त झाले असून सध्या पत्नीसमवेत गावात शेती करून राहतात.
दि. ७ ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेचारच्या सुमारास गवंड दाम्पत्य यलमार मंगेवाडी येथील मरीआई देवीच्या यात्रेसाठी नातेवाईकांकडे गेले होते. घर बंद करताना त्यांनी सोन्या-चांदीचे दागिने व रोकड कपाटात ठेवली होती.
दरम्यान, दुसऱ्या दिवशी घरातील काही कागदपत्रे कोरडा नदीच्या काठावर आढळल्याची माहिती पुतण्याने गवंड यांना फोनवरून दिली. त्यानंतर परिचित व्यक्तीला घरी पाठविले
असता घराचे कुलूप तुटलेले आणि घरातील साहित्य अस्ताव्यस्त असल्याचे दिसून आले.
घराची पाहणी केली असता चार तोळ्यांचे सोन्याचे मंगळसूत्र, तीन तोळ्यांची सोन्याची चैन, सोन्याची अंगठी, चांदीचे ब्रेसलेट आणि ३५ हजार रुपये रोख, असा एकूण ३ लाख ६५ हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेल्याचे स्पष्ट झाले.
मेडशिंगीतही बंद घराचा दरवाजा तोडला
मेडशिंगी येथे दिलीप भिमराव गाडेकर (वय ६५) यांच्या घरातही चोरट्यांनी डल्ला मारत ५ लाख ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला.
गाडेकर हे शेती तसेच बीएसटीच्या पेन्शनवर कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. दि. ३ ऑगस्ट रोजी ते पत्नीसमवेत कोर्टाच्या कामासाठी मुंबईला गेले होते.
घरात त्यांची बहीण कमल गवळी होती. मात्र प्रकृती अस्वस्थ झाल्याने त्या ४ ऑगस्ट रोजी मुलीकडे राहण्यासाठी गेल्या.
दि. ५ ऑगस्ट रोजी पुतण्याने घरात जाऊन गॅस कनेक्शनच्या फाईलचा फोटो काढून गाडेकर यांना पाठविला आणि घराला पुन्हा कुलूप लावले. मात्र, ७ ऑगस्ट रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास घराचे मुख्य दरवाजाचे कुलूप कापल्याचे आढळले.
गाडेकर ८ ऑगस्ट रोजी घरी परतल्यानंतर लोखंडी कपाटाची पाहणी केली असता सोन्याचे दागिने आणि रोकड गायब असल्याचे समोर आले. चोरीस गेलेल्या वस्तूंमध्ये पाच तोळे
नऊ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र, दोन सोन्याच्या अंगठ्या, बोरमाळ, लक्ष्मीहार, सोन्याची चैन व पेंडल, मोहनमाळ, सोन्याचा हार आणि सात हजार रुपये रोख, असा एकूण ५ लाख ७५ हजार रुपयांचा ऐवज आहे.
बंद घरांची रेकी करून चोरी?
दोन्ही घटनांमध्ये घरातील व्यक्ती बाहेर गेल्याची संधी साधून चोरट्यांनी मुख्य दरवाजाचे कुलूप तोडले. घरात प्रवेश केल्यानंतर कपाटातील मौल्यवान दागिने
आणि रोकड घेऊन चोरटे पसार झाले. आगलावेवाडी येथील घटनेच्या चौकशीत मानेगाव परिसरातील एका घरातही चोरी झाल्याची माहिती फिर्यादीत नमूद करण्यात आली आहे.
एकाच कालावधीत परिसरातील बंद घरांमध्ये चोरीच्या घटना घडल्याने चोरट्यांची टोळी बंद घरांची माहिती मिळवून नियोजनबद्ध पद्धतीने घरफोड्या करीत आहे का? असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
पोलिसांकडून तपास सुरू
दोन्ही घटनांची नोंद सांगोला पोलिसांत करण्यात आली असून पोलिसांकडून तपास सुरू आहे. घटनास्थळावरील पुरावे, संशयितांच्या हालचाली आणि उपलब्ध सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्यांचा शोध घेतला जात आहे.
नागरिकांनी सतर्क राहण्याची गरज
ग्रामीण भागात बंद घरांना लक्ष्य करून चोरीच्या घटना वाढत असल्याने नागरिकांनी खबरदारी घेण्याची गरज आहे. घर बंद करून बाहेर जाताना मोठी रोकड किंवा मौल्यवान दागिने घरात न ठेवणे, शेजाऱ्यांना माहिती देणे,
दरवाजांची सुरक्षितता तपासणे आणि शक्य असल्यास सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे आवश्यक आहे. वाढत्या घरफोड्यांना आळा घालून चोरट्यांचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.


0 Comments