जवळा मंडळाधिकाऱ्यांवर जिल्हाधिकाऱ्यांची निलंबनाची कारवाई; प्रशासकीय हलगर्जीपणा भोवला
सांगोला, दि. २० ऑगस्ट २०२६ : सांगोला तालुक्यातील जवळा मंडळ अधिकारी सूर्यकांत उत्तम डिकोळे यांच्यावर प्रशासकीय कामकाजातील निष्काळजीपणा आणि वरिष्ठांच्या
आदेशाचे पालन न केल्याच्या कारणावरून जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी निलंबनाची कारवाई केली आहे. ही माहिती सांगोल्याच्या तहसीलदार बाळूताई भागवत यांनी दिली.
जवळा मंडळ अधिकारी म्हणून कार्यरत असताना डिकोळे हे तहसीलदारांनी विविध विषयांवर आयोजित केलेल्या बैठकींना गैरहजर राहिल्याचे, फेरफार प्रकरणे प्रलंबित ठेवल्याचे तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशांकडे दुर्लक्ष केल्याचे निदर्शनास आले होते.
याशिवाय अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतुकीच्या बाबतीत अपेक्षित कार्यवाही न करणे, नागरिकांच्या कामकाजात अडथळे निर्माण होणे यांसह विविध तक्रारी व बाबी प्रशासनाच्या निदर्शनास आल्या होत्या.
प्रशासकीय कामकाजात अत्यंत बेजबाबदारपणा, निष्काळजीपणा व हलगर्जीपणा केल्याचे आढळून आल्याने महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम, १९७९ मधील नियम ३ चा भंग झाल्याचे नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी निलंबनाचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आला होता. त्यानुसार नियुक्त प्राधिकारी तसेच शिस्तभंगविषयक अधिकारी म्हणून प्राप्त अधिकारांचा वापर करत जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी सूर्यकांत उत्तम डिकोळे यांच्या निलंबनाचे आदेश जारी केले.
मोहोळ तहसील कार्यालय राहणार मुख्यालय
निलंबनाच्या कालावधीत सूर्यकांत डिकोळे यांचे मुख्यालय मोहोळ तहसील कार्यालय राहणार आहे. तहसीलदारांची पूर्वपरवानगी घेतल्याशिवाय त्यांना मुख्यालय सोडता येणार नसल्याचेही निलंबन आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.
जवळा मंडळातील प्रशासकीय कामकाजाबाबत झालेल्या तक्रारी आणि त्यानंतर झालेल्या चौकशीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी केलेली ही कारवाई सांगोला तालुक्यात चर्चेचा विषय ठरली आहे.


0 Comments