माण नदीला पूर्ण क्षमतेने पाणी; आमदार बाबासाहेब देशमुखांच्या पाठपुराव्याला यश
सांगोला : प्रतिनिधी पावसाचे पाणी कृष्णा नदीतून वाहून जाण्याऐवजी त्याचा सांगोला तालुक्याला लाभ मिळावा, यासाठी आमदार डॉ. भाई बाबासाहेब देशमुख यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर यश आले आहे.
टेंभू-म्हैसाळ योजनेतून माण नदीमध्ये पूर्ण क्षमतेने पाणी सोडण्यात आले असून, त्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
आमदार बाबासाहेब देशमुख यांनी विधानसभेच्या अधिवेशनात कृष्णा नदीतून वाहून जाणारे अतिरिक्त पावसाचे पाणी टेंभू-म्हैसाळ योजनेच्या माध्यमातून सांगोला तालुक्याला मिळावे, अशी महत्त्वपूर्ण मागणी केली होती.
त्याचबरोबर मुख्यमंत्री, पाटबंधारे मंत्री तसेच सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन माण नदीला पाणी सोडण्याची मागणीही त्यांनी केली होती.
या पाठपुराव्याची दखल घेत माण नदीत पूर्ण क्षमतेने पाणी सोडण्यात आले आहे. निंबवडे, विठ्ठलापूर, खवासपूर, लोटेवाडी मार्गे हे पाणी सोडण्यात आले
असून, आगामी काळात कोरडा नदीलाही पाणी सोडण्यात येणार आहे. तसेच फाटा क्रमांक ४ व ५ ला देखील पाणी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
पाऊस लांबल्याच्या पार्श्वभूमीवर माण नदीला आलेल्या पाण्यामुळे सांगोला तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. नदीला पाणी आल्याने शेतीच्या पाण्याचा प्रश्न काही प्रमाणात सुटण्यास मदत होणार असून, शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
शेतकरी, कष्टकरी आणि गरीब जनतेचे प्रश्न आमदार बाबासाहेब देशमुख यांनी सभागृहात पोटतिडकीने मांडून त्याचा सातत्याने पाठपुरावा केला.
या प्रयत्नातून माण नदीला पाणी मिळवून देण्यात त्यांना यश आले असून, त्यांच्या या महत्त्वपूर्ण कामाचे शेतकरी वर्गातून कौतुक होत असल्याचे भाई चंद्रकांत सरतापे यांनी सांगितले.


0 Comments