एखतपूरात जुन्या वादाला तोंड फुटले; मध्यस्थीला गेलेल्या तरुणावर धारदार हत्याराने हल्ला
सांगोला : मागील दिवशी झालेला वाद मिटवण्यासाठी गेलेल्या तरुणावरच धारदार तलवारीसदृश हत्यार आणि कुऱ्हाडीच्या लोखंडी दांड्याने हल्ला करण्यात आल्याची घटना १५ ऑगस्ट रोजी सकाळी एकतपूर येथे घडली.
या मारहाणीत फिर्यादीसह अन्य काही जण जखमी झाले असून, काळ्या रंगाच्या क्रेटा कारचीही तोडफोड करण्यात आल्याचे पोलिसांत दाखल फिर्यादीत नमूद आहे.
या प्रकरणी सुशांत कृष्णदेव पाटील (वय ३५, रा. चिनके, ता. सांगोला) यांच्या फिर्यादीवरून सुरज पाटील, उदय पाटील, प्रताप पाटील, विजय बबन पाटील,
शोभा पाटील, पुणम पाटील, चित्रा पाटील आणि काजल पाटील (सर्व रा. एकतपूर) यांच्याविरुद्ध सांगोला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, सुशांत पाटील हे १५ ऑगस्ट रोजी सकाळी सुमारे १० वाजता सुनिता पाटील यांच्या घरी मागील दिवशी झालेला वाद मिटवण्यासाठी गेले होते.
त्यावेळी आरोपींनी ‘तुम्ही आमचे भांडण मिटवणारे कोण?’ असे म्हणत त्यांच्याशी वाद घातल्याचा आरोप आहे.
वाद वाढल्यानंतर उदय पाटील याने स्टीलसारखे चमकणारे तलवारीसदृश हत्याराने सुशांत पाटील यांच्या हाताच्या मनगटाजवळ आणि पोटरीवर वार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
त्यानंतर पुन्हा हल्ला करण्याचा प्रयत्न सुरू असताना दत्ता पाटील मध्ये आल्याने त्याच्या हातालाही दुखापत झाल्याचे नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, सुरज पाटील याने अशोक पाटील यांच्या डोक्यात व पाठीवर तसेच विजय विठ्ठल पाटील यांच्या मानेवर त्याच प्रकारच्या हत्याराने मारहाण केल्याचा आरोप आहे.
प्रताप पाटील याने विजय बबन पाटील यांच्या हातातील कुऱ्हाडीच्या लोखंडी दांड्याने सुशांत पाटील यांच्या पायावर व पाठीवर मारहाण केली. तसेच अशोक पाटील यांच्या डोक्यातही दांड्याने मारल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
पुणम पाटील, चित्रा पाटील आणि काजल पाटील यांनी सुशांत पाटील यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करत शिवीगाळ केल्याचा आरोप आहे.
तसेच शोभा बबन पाटील यांनी सुशांत यांच्या चुलत भावाला भागवत मनोहर पाटील यांना काठीने मारहाण केल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे.
क्रेटा कारचीही तोडफोड
मारहाणीच्या गोंधळात काळ्या रंगाच्या क्रेटा कारची तोडफोड करून नुकसान केल्याचा आरोपही करण्यात आला आहे. त्यामुळे या घटनेत मारहाणीसोबत वाहनाचे नुकसान झाल्याचेही पोलिसांच्या तपासात समोर येत आहे.
या प्रकरणी सांगोला पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ७३४/२०२६ नुसार BNS कलम 118(1), 115(2), 351(2)(3), 352, 324(4), 189(2), 191(2), 191(3) आणि 190 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही पोहेकॉ/१८१० वाघमोडे यांनी केली असून, पुढील तपास पोहेकॉ/१२१५ कोकरे करीत आहेत. हल्ल्यात वापरण्यात आलेली हत्यारे, जखमींच्या दुखापती तसेच वाहनाच्या नुकसानीबाबत पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.


0 Comments