सणांपूर्वी सांगोल्यातील खड्डे बुजवा; अन्यथा जनआंदोलनाचा इशारा पत्रकार मिनाज खतीब
सांगोला / तालुका प्रतिनिधी : सांगोला शहरातील प्रमुख रस्त्यांवर पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे नागरिकांची गैरसोय होत असून, आगामी पैगंबर जयंती व रक्षाबंधन सणांच्या पार्श्वभूमीवर रस्त्यांची तातडीने डागडुजी करण्यात यावी,
अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार मिनाज खतीब यांनी केली आहे. प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्यास नागरिकांना सोबत घेऊन तीव्र जनआंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
शहरातील मुख्य बाजारपेठ, प्रमुख चौक तसेच पारंपरिक मिरवणूक मार्गावर अनेक ठिकाणी रस्त्यांची अवस्था खराब झाली आहे.
खड्ड्यांमुळे दुचाकीस्वार, महिला, विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. पावसामुळे खड्ड्यांमध्ये पाणी साचत असल्याने त्यांची खोली लक्षात न आल्याने अपघाताचा धोका आणखी वाढला आहे.
पैगंबर जयंती आणि रक्षाबंधनानिमित्त शहरातील बाजारपेठ व धार्मिक स्थळांच्या परिसरात नागरिकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे.
त्यामुळे सणांच्या आधीच रस्त्यांची डागडुजी, खड्डे बुजविणे आणि धोकादायक ठिकाणी आवश्यक त्या उपाययोजना करणे गरजेचे असल्याचे खतीब यांनी म्हटले आहे.
भुयारी गटाराच्या कामानंतर रस्ते पूर्ववत करण्याची जबाबदारी कोणाची?
सांगोला शहरातील रस्त्यांच्या दुरवस्थेमागे भुयारी गटार योजनेच्या कामाचाही मोठा वाटा असल्याचा आरोप खतीब यांनी केला आहे. भुयारी गटारासाठी अनेक ठिकाणी रस्ते खोदण्यात आले;
मात्र काम पूर्ण झाल्यानंतर रस्ते पूर्ववत करण्याचे काम समाधानकारक पद्धतीने झाले नसल्याने शहरात ठिकठिकाणी खड्डे निर्माण झाले आहेत.
कोट्यवधी रुपयांच्या योजनेवर खर्च होत असताना नागरिकांना मात्र खराब रस्त्यांचा त्रास सहन करावा लागत आहे. काही ठिकाणी रस्त्यांची दुरुस्ती निकृष्ट दर्जाची
झाल्याचा आरोपही करण्यात आला आहे. संबंधित ठेकेदाराच्या कामाची पाहणी करून दोष आढळल्यास दंडात्मक कारवाई करावी आणि रस्ते तातडीने पूर्ववत करावेत, अशी मागणी खतीब यांनी केली.
“सणांच्या काळात नागरिकांच्या सुरक्षिततेशी तडजोड केली जाऊ नये. नगरपालिका प्रशासनाने तातडीने रस्त्यांची पाहणी करून खड्डे बुजवावेत. मागणीकडे दुर्लक्ष झाल्यास नागरिकांना सोबत घेऊन जनआंदोलन उभारण्यात येईल,” असा इशारा पत्रकार मिनाज खतीब यांनी दिला आहे.
दरम्यान, शहरातील खराब रस्त्यांबाबत नागरिकांमध्येही नाराजी असून नगरपालिका प्रशासनाने तातडीने ठोस उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.


0 Comments