Breaking News

पैगंबर जयंतीनिमित्त सांगोल्यात सामाजिक उपक्रमाला गती; मुस्लिम बांधवांकडून वृक्षारोपणातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश

पैगंबर जयंतीनिमित्त सांगोल्यात सामाजिक उपक्रमाला गती; मुस्लिम बांधवांकडून वृक्षारोपणातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश


सांगोला / तालुका प्रतिनिधी : पैगंबर जयंतीचे औचित्य साधून सांगोला शहरातील विविध भागांत मुस्लिम बांधवांच्या पुढाकारातून वृक्षारोपणाचा सामाजिक उपक्रम उत्साहात पार पडला. 

धार्मिक उत्सवासोबत सामाजिक आणि पर्यावरणीय बांधिलकी जपत या उपक्रमातून नागरिकांना पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला.

शाही जामा मस्जिद, सफेद मस्जिद, मक्का मस्जिद, मणेरी मस्जिद तसेच कबरस्तान मस्जिद यांच्या वतीने शहरातील विविध ठिकाणी वृक्षांची लागवड करण्यात आली.

 वाढते प्रदूषण, घटते हरित क्षेत्र आणि पर्यावरणाचा समतोल यांचा विचार करून भविष्यातील पिढ्यांसाठी हिरवाई जपण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.

या उपक्रमात हाजी शब्बीरभाई खतिब, शिवसेना शहर प्रमुख कमरुद्दीन खतिब, अध्यक्ष मोईन तांबोळी, उपाध्यक्ष एजाज अहमद शेख, 

सचिव सोहेल मुलाणी यांच्यासह जहूर खतिब, मोहसिन मुजावर, साहील खतिब, आयाज मणेरी, अल्ताफ मुलाणी आणि मुबीन तांबोळी यांनी विशेष परिश्रम घेतले.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी पैगंबर मोहम्मद यांच्या शिकवणुकीत मानवता, स्वच्छता आणि निसर्ग संवर्धनाला महत्त्व असल्याचे सांगितले. 

वृक्षारोपण ही केवळ एकदिवसीय मोहीम न राहता लावलेल्या झाडांचे संगोपन करण्याची जबाबदारीही प्रत्येकाने स्वीकारली पाहिजे, असे आवाहन करण्यात आले.

धार्मिक कार्यक्रमांना सामाजिक उपक्रमाची जोड देत पर्यावरण रक्षणाचा सकारात्मक संदेश देण्यात आल्याने नागरिकांनी या उपक्रमाचे स्वागत केले.

 सांगोला शहरात अशा सामाजिक उपक्रमांची परंपरा अधिक व्यापक व्हावी, अशी अपेक्षाही यावेळी व्यक्त करण्यात आली.

Post a Comment

0 Comments