पुरोगामी युवक संघटना आमदार बाबासाहेब देशमुखांच्या नेतृत्वाखालीच; भाई दिपक गोडसेंचा दावा
सांगोला : मुंबई येथे शेतकरी कामगार पक्षाच्या पुरोगामी युवक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याच्या चर्चेला पुरोगामी युवक संघटनेचे सांगोला तालुकाध्यक्ष भाई दिपक गोडसे यांनी स्पष्ट शब्दांत उत्तर दिले आहे.
“तालुकास्तरावर संघटनेत कार्यरत असलेल्या कोणत्याही पदाधिकाऱ्याने पक्षांतर केलेले नाही. पुरोगामी युवक संघटना यापुढेही आमदार डॉ. भाई बाबासाहेब देशमुख यांच्या नेतृत्वाखालीच कार्यरत राहील,” असे त्यांनी सांगितले.
गोडसे म्हणाले की, पुरोगामी युवक संघटनेची जबाबदारी स्व. आबासाहेबांनी माझ्यासह अनेक कार्यकर्त्यांवर सोपवली होती. ही जबाबदारी सर्वांनी सक्षमपणे पार पाडली असून सध्या आमदार डॉ. भाई बाबासाहेब देशमुख यांच्या नेतृत्वाखाली संघटनेचे काम सुरू आहे.
शेतकरी कामगार पक्षाने पुरोगामी युवक संघटनेच्या माध्यमातून अनेक युवकांना विविध पदांवर काम करण्याची संधी दिली. या संधीचा उपयोग करून अनेक युवकांनी आपली राजकीय आणि सामाजिक ओळख निर्माण केली आहे.
संघटनेमध्ये कोणतीही नाराजी नसताना काही घटनांना वेगळे स्वरूप देऊन संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोपही गोडसे यांनी केला.
“मुंबईतील प्रवेशामध्ये केवळ शेतकरी कामगार पक्ष किंवा पुरोगामी युवक संघटनेचेच कार्यकर्ते नव्हते. इतर पक्षांतील नेते आणि कार्यकर्त्यांचाही त्यामध्ये समावेश होता.
मात्र चर्चेचा केंद्रबिंदू केवळ शेकाप आणि पुरोगामी युवक संघटना करण्यात येत आहे. ग्रामीण भागातील भाषेत यालाच ‘पराचा कावळा करणे’ असे म्हणतात,” अशी टीका त्यांनी केली.
आमदार डॉ. भाई बाबासाहेब देशमुख हे विकासकामे आणि नागरिकांच्या प्रश्नांवर सातत्याने काम करत असून त्यांच्या संपर्कात येणाऱ्या नागरिकांची कामे मार्गी लावली जात आहेत.
अशा परिस्थितीत पुरोगामी युवक संघटनेचे नाव घेऊन संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न जनतेच्या लक्षात येत असल्याचे गोडसे यांनी नमूद केले.
“पुरोगामी युवक संघटनेचे युवा नेते आणि कार्यकर्ते निस्वार्थीपणे काम करत आहेत. संघटनेत कोणतीही नाराजी नाही.
आम्ही आगामी काळातही आमदार डॉ. भाई बाबासाहेब देशमुख यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून संघटनेचे काम जोमाने सुरू ठेवणार आहोत,” असा निर्धार भाई दिपक गोडसे यांनी व्यक्त केला.


0 Comments