कृष्णा-नीरा पाणी वळविण्याच्या योजनेला प्रशासकीय हिरवा कंदील; दुष्काळी भागाच्या जलसुरक्षेकडे ऐतिहासिक पाऊल
डीपीआरसाठी ₹२४.०५ कोटींची मंजुरी; सांगोला, माण, खटाव, माळशिरससह सातारा, सोलापूर व पुणे जिल्ह्यांना दीर्घकालीन दिलासा मिळण्याची अपेक्षा
सांगोला | प्रतिनिधी दुष्काळी भागातील पाणीटंचाईवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याच्या दिशेने राज्य शासनाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.
कृष्णा नदीतील महाराष्ट्राच्या वाट्याचे पाणी नीरा नदीमार्गे उजनी धरणापर्यंत आणण्याच्या महत्त्वाकांक्षी योजनेच्या सर्वेक्षण, अन्वेषण, संकल्पन आराखडा आणि सविस्तर
प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्यासाठी ₹२४ कोटी ५ लाख ६७ हजार १२५ इतक्या खर्चास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. जलसंपदा विभागाने यासंदर्भातील शासन निर्णय २२ जुलै रोजी जारी केला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि ग्रामविकास मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली या योजनेला गती मिळाली आहे.
या प्रकल्पामुळे कृष्णा खोऱ्यातील उपलब्ध पाण्याचा अधिक परिणामकारक वापर करून दुष्काळी भागाला दीर्घकालीन जलसुरक्षा देण्याचा शासनाचा मानस आहे.
या योजनेत सापटेवाडी बंधारा (कृष्णा नदी) ते नीरा नदीवरील उद्धट बंधारा आणि उद्धट बंधारा ते उजनी धरण अशा दोन टप्प्यांमध्ये सर्वेक्षण व प्रकल्प आराखडा तयार करण्यात येणार आहे.
यामुळे सांगोला, माण, खटाव, माळशिरस तसेच नीरा खोऱ्यातील इतर दुष्काळग्रस्त भागांना भविष्यात सिंचन व पिण्याच्या पाण्याचा मोठा आधार मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
या प्रकल्पासाठी माजी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी राज्य व केंद्र शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केल्याचे सांगितले जात आहे.
त्यांच्या प्रयत्नांनंतर शासनाने सर्वेक्षण आणि डीपीआर तयार करण्यास अधिकृत मान्यता दिली असून, प्रकल्पाच्या पुढील प्रक्रियेला वेग मिळाला आहे.
शासन निर्णयानुसार प्रकल्पासाठी आवश्यक तांत्रिक मान्यता, कृष्णा पाणी तंटा लवादाच्या तरतुदींचे पालन, पारदर्शक निविदा प्रक्रिया
आणि अर्थसंकल्पीय निधीतून खर्च करण्याच्या अटी निश्चित करण्यात आल्या आहेत. डीपीआर मंजूर झाल्यानंतर प्रत्यक्ष कामाला प्रारंभ होणार आहे.
या प्रकल्पामुळे उजनी धरणातील पाणीसाठ्यात वाढ होऊन सातारा, सोलापूर आणि पुणे जिल्ह्यांतील दुष्काळी भागांना मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.
भविष्यात लाखो शेतकरी, नागरिक आणि पशुपालकांना याचा लाभ होऊन दुष्काळमुक्तीच्या दिशेने हा प्रकल्प महत्त्वाचा टप्पा ठरेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
चौकट | चेतनसिंह केदार-सावंत यांची प्रतिक्रिया
"मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली दुष्काळी भागासाठी अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. कृष्णा-नीरा पाणी वळविण्याच्या योजनेमुळे सातारा, सोलापूर आणि पुणे जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त भागाच्या विकासाला नवी दिशा मिळेल.
या विषयासाठी माजी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून, भविष्यात लाखो शेतकरी आणि नागरिकांना या निर्णयाचा लाभ होईल."
— चेतनसिंह केदार-सावंत
भाजपा जिल्हाध्यक्ष तथा सोलापूर जिल्हा परिषद शिक्षण व आरोग्य सभापती


0 Comments