चोपडीत 26 वर्षीय युवकाची गळफास घेऊन आत्महत्या; सांगोला पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद
सांगोला, ता. 24 : सांगोला तालुक्यातील चोपडी गावात 26 वर्षीय युवकाने राहत्या घरात गळफास घेऊन जीवन संपवल्याची दुर्दैवी घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली.
या प्रकरणी सांगोला पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दयावान भरत केंगार (वय 26, रा. चोपडी, ता. सांगोला) असे मृत युवकाचे नाव आहे.
त्याची आई संगीता भरत केंगार या गावातील महिलांसोबत पंढरपूर येथे देवदर्शनासाठी गेल्या होत्या. मुलगा दयावान याने त्यांना गावातील बसस्थानकापर्यंत सोडले होते.
दुसऱ्या दिवशी सकाळी त्या घरी परतल्यानंतर मुलाला फोन करून घरी बोलावण्याचा प्रयत्न केला;
मात्र त्याने फोन उचलला नाही. त्यामुळे त्या नातेवाईकासह घरी गेल्या असता घराचा दरवाजा आतून बंद असल्याचे दिसले.
हाका मारूनही प्रतिसाद न मिळाल्याने दरवाजा उघडून आत प्रवेश केला असता दयावान हा पत्र्याच्या अँगलला दोरीच्या साहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला.
गावातील नागरिक आणि पोलीस पाटील यांच्या मदतीने त्याला खाली उतरवून
तातडीने ग्रामीण रुग्णालय, सांगोला येथे दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर त्याला उपचारापूर्वीच मृत घोषित केले.
मृत युवकाच्या आईने दिलेल्या जबाबात मृत्यूबाबत कोणावरही संशय किंवा तक्रार नसल्याचे नमूद केले आहे. याप्रकरणी सांगोला पोलीस ठाण्यात अकस्मात
मृत्यू रजिस्टर क्रमांक 131/2026 अन्वये नोंद करण्यात आली असून, पुढील तपास पोहेकॉ. 1652 कोष्टी करीत आहेत.


0 Comments