वनाधिकाऱ्यांना धमकावून सरकारी कामात अडथळा; अवैध लाकूड वाहतूक प्रकरणी दोघांविरुद्ध सांगोला पोलिसांत गुन्हा
सांगोला | प्रतिनिधी सांगोला तालुक्यात अवैधरीत्या तोडलेल्या झाडांची लाकडे वाहतूक करताना वन विभागाच्या पथकाने कारवाई केल्यानंतर वनरक्षकाला धक्काबुक्की,
शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी दोघांविरुद्ध सांगोला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत वनरक्षक संजय वसंत नरळे (वय ३०, रा. तिप्पेहळ्ळी, ता. सांगोला) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार, दि. १९ जुलै २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ६ वाजता हटकर-मंगेवाडी बीटमध्ये सरकारी गणवेशात गस्त घालत असताना
माळवाडी (जुनोनी) परिसरात एमएच-११ एएल-३२५८ क्रमांकाच्या आयशर टेम्पोमधून अवैधरीत्या तोडलेल्या झाडांची लाकडे वाहतूक होत असल्याचे आढळून आले.
वन विभागाच्या पथकाने संबंधित वाहन वनपरिक्षेत्र कार्यालयात आणण्यास सांगितले
असता चालक समाधान बापू डोंबाळे (रा. घोरपडी, ता. कवठेमहांकाळ, जि. सांगली) याने सरकारी कारवाईला विरोध करत वनरक्षकाला शिवीगाळ, दमदाटी व धक्काबुक्की केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. त्यानंतर तो घटनास्थळावरून पळून गेला.
याच प्रकरणात रोहित सदाशिव शिंगाडे (रा. गौडवाडी, ता. सांगोला) याने मोबाईलवरून फोन करून वाहन जप्त केल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी धमकी दिल्याचेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी दोघांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 132, 351(2), 351(3), 352 व 3(5) अन्वये सांगोला पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 656/2026 दाखल करण्यात आला आहे.
या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल वाघ करीत आहेत.


0 Comments