Breaking News

स्व.आकाश घोंगडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त सांगोला विद्यामंदिरात १,००० वह्यांचे वाटप

स्व.आकाश घोंगडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त सांगोला विद्यामंदिरात १,००० वह्यांचे वाटप


सांगोला (प्रतिनिधी) आपल्या प्रियजनांच्या पवित्र स्मृती कशा जपाव्यात, याचा एक अतिशय विधायक आणि समाजाला दिशा देणारा आदर्श सांगोल्यातील ज्येष्ठ विधीज्ञ उदय बापू घोंगडे,आनंद घोंगडेआणि त्यांच्या परिवाराने घालून दिला आहे.

 आपला सुपुत्र स्व. आकाश उर्फ प्रणव उदय घोंगडे याच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून घोंगडे परिवाराच्या वतीने 

सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेजमध्ये  १,००० वह्यांचे मोफत वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी राबवलेला हा उपक्रम खऱ्या अर्थाने एक अत्यंत मौलिक आणि महत्त्वपूर्ण कार्य ठरले आहे.

  समाजाचे आपण काही देणे लागतो, या कृतज्ञतेच्या भावनेतून घोंगडे परिवाराकडून दरवर्षी हा स्तुत्य उपक्रम राबवला जातो.  एक हजार वह्यांचे वाटप करणे

 हा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वाटचालीतील एक फार मोठा आधार आहे. गरजू व गुणवंत विद्यार्थ्यांना या शैक्षणिक साहित्यामुळे मोठे प्रोत्साहन मिळते. यापूर्वीही घोंगडे परिवाराकडून गरजू विद्यार्थ्यांना गणवेश,

 शालेय खाऊ, पेन आणि पुस्तके यांसारख्या साहित्याचे नियमित वाटप करण्यात आले आहे. 

त्यांच्या या सातत्यपूर्ण योगदानामुळे अनेक होतकरू मुलांच्या शिक्षणातील अडचणी दूर होण्यास मोठी मदत होत आहे.

हा प्रेरणादायी कार्यक्रम सांगोला विद्यामंदिर प्रशाला येथे  संपन्न झाला. याप्रसंगी प्रशालेचे प्राचार्य चारुदत्त जगताप, उपमुख्याध्यापक प्रदीप धुकटे, उत्सव विभाग प्रमुख नरेंद्र होनराव यांच्यासह शाळेतील सर्व शिक्षकवृंद, 

शिक्षकेतर कर्मचारी यांचे हस्ते विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले. हाती नव्या कोऱ्या वह्या मिळताच विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद घोंगडे परिवाराच्या या विधायक कार्याचे सार्थक करणारा होता.

शाळेच्या वतीने घोंगडे परिवाराच्या या सामाजिक बांधिलकीचे अतिशय मनापासून कौतुक करण्यात आले.

 *चौकट* -स्मृती जतनाचा एक 'मौलिक' आणि अनुकरणीय आदर्श

   स्व.आकाश घोंगडे यांच्या स्मृती कायमस्वरूपी जपण्यासाठी घोंगडे परिवाराने शिक्षणाचा जो मार्ग निवडला, ती बाब अत्यंत कौतुकास्पद आहे. तब्बल एक हजार वह्यांचे वाटप हे केवळ साहित्याचे वाटप नसून, 

ती अनेक विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्याची आणि ज्ञानाची नवी पाने आहेत. स्मृतिदिनानिमित्त समाजोपयोगी  कार्य कसे करावे,

 याचा एक उत्तम आणि अनुकरणीय आदर्श घोंगडे परिवाराने यातून समाजासमोर ठेवला आहे.

Post a Comment

0 Comments