वारीत आरोग्यसेवेचा सेवायज्ञ; वाखरीत आमदार डॉ. बाबासाहेब देशमुखांचा मानवतेचा आदर्श
सांगोला | प्रतिनिधी आषाढी वारी म्हणजे लाखो वारकऱ्यांच्या श्रद्धा, भक्ती आणि समर्पणाचा महासागर. या भक्तिमय वातावरणात वारकऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याचा सेवाभाव जपत
सांगोल्याचे आमदार डॉ. भाई बाबासाहेब देशमुख यांनी यंदाही वाखरी येथे आरोग्यसेवेचा उपक्रम राबवून मानवतेचा आदर्श कायम ठेवला.
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी तळ आणि संत तुकाराम महाराज पालखी तळ परिसरात लोकप्रिय आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख मेडिकल फॅकल्टी,
सांगोला यांच्या माध्यमातून वारकऱ्यांसाठी आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यात आली. आमदार डॉ. देशमुख यांनी विविध आरोग्य केंद्रांना भेट देत रुग्णांची विचारपूस केली, उपचार व्यवस्थेची पाहणी केली आणि वैद्यकीय पथकाला आवश्यक सूचना दिल्या.
यावेळी त्यांनी महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाच्या विविध सुविधा आणि अतिदक्षता विभागाची पाहणी करून तेथील डॉक्टर व कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. तसेच उपचार घेत असलेल्या वारकऱ्यांच्या प्रकृतीची माहिती घेऊन त्यांना धीर दिला.
मुख्यमंत्री वारकरी सुविधा केंद्रालाही त्यांनी भेट देत तेथील आरोग्य, निवास व इतर मूलभूत सुविधांचा आढावा घेतला. वारकऱ्यांना अधिक परिणामकारक सेवा देण्यासाठी डॉक्टर, आरोग्य कर्मचारी आणि स्वयंसेवकांशी चर्चा करून आवश्यक मार्गदर्शन केले.
वारीदरम्यान विविध सामाजिक संस्था आणि चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून सुरू असलेल्या पादाभ्यंग, कांस्य थाळी फूट मसाज,
चरणसेवा आदी सेवाभावी उपक्रमांचीही त्यांनी पाहणी केली. वारकऱ्यांच्या आरोग्याशी संबंधित गरजा आणि सुविधा अधिक सक्षम करण्यावर यावेळी विशेष भर देण्यात आला.
या सेवाकार्यात डॉ. निरंजन केदार, डॉ. आगवणे, अमर चव्हाण, शंकर माने, नवनाथ आदिलिंगे, सुशांत कोडक, आरोग्य कर्मचारी तसेच महुद येथील माजी आरोग्यसेवक आप्पा बाबर यांनी सक्रिय सहभाग नोंदविला.
वारकऱ्यांच्या आपत्कालीन सेवेसाठी धनराज ॲम्ब्युलन्सची व्यवस्था उपलब्ध असल्याची माहिती भाई चंद्रकांत सरतापे यांनी दिली.
वारकऱ्यांच्या सेवेला प्राधान्य देत प्रत्यक्ष मैदानात उतरून आरोग्यसेवा देणारे आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांचा हा सेवाभावी उपक्रम वारकरी, वैद्यकीय कर्मचारी आणि नागरिकांकडून विशेष कौतुकाचा विषय ठरत आहे.


0 Comments