विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांना समर्थन; दोषींवर कारवाई व मागण्यांवर तातडीने निर्णय घेण्याची मागणी मा.अनिकेतभैया देशमुख
सांगोला | प्रतिनिधी दिल्लीतील जंतरमंतर येथे विविध न्याय्य मागण्यांसाठी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ
सांगोला शहरात विद्यार्थ्यांनी बुधवारी तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढत केंद्र सरकारविरोधात तीव्र संताप व्यक्त केला. विद्यार्थी, युवक, सामाजिक कार्यकर्ते आणि विविध संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले होते.
विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला शेतकरी कामगार पक्षाने जाहीर पाठिंबा देत त्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी पक्ष कायम सोबत राहील, अशी भूमिका स्पष्ट केली. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर दडपशाही न करता संवादातून तोडगा काढण्याची गरज असल्याचेही यावेळी वक्त्यांनी नमूद केले.
मोर्चाला संबोधित करताना डॉ. अनिकेत भैया देशमुख म्हणाले, "विद्यार्थी हे देशाच्या भविष्यातील शिल्पकार आहेत. त्यांच्या शांततापूर्ण आंदोलनावर लाठीचार्ज करणे लोकशाहीच्या मूलभूत मूल्यांवर आघात आहे.
शिक्षण, रोजगार आणि न्याय्य हक्कांसाठी आवाज उठविणाऱ्या तरुणांना दडपण्याचा प्रयत्न कधीही स्वीकारला जाणार नाही. अन्यायाविरोधात उभे राहण्याचे धैर्य प्रत्येक युवकाने दाखवले पाहिजे."
मोर्चानंतर आंदोलनकर्त्यांनी तहसील कार्यालयात जाऊन तहसीलदारांना निवेदन सादर केले.
जंतरमंतर येथील लाठीचार्जची निष्पक्ष चौकशी करून संबंधित दोषींवर कठोर कारवाई करावी तसेच विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांवर तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.
आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांनी जोरदार घोषणाबाजी करत केंद्र सरकारच्या भूमिकेचा निषेध नोंदविला. संपूर्ण आंदोलन शांततापूर्ण आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडले. विविध विद्यार्थी संघटना, शेतकरी कामगार पक्षाचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांची यावेळी लक्षणीय उपस्थिती होती.
यावेळी आंदोलनकर्त्यांनी विद्यार्थ्यांच्या हक्कांसाठीचा लढा अधिक व्यापक करण्याचा निर्धार व्यक्त केला. मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास भविष्यात
आणखी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला. शेतकरी कामगार पक्षाने विद्यार्थ्यांच्या प्रत्येक न्याय्य लढ्यात ठामपणे त्यांच्या पाठीशी उभे राहण्याची ग्वाही दिली.


0 Comments