सांगोला शहरातील रस्त्यांची दुरवस्था; अवैज्ञानिक गतिरोधकांमुळे वाहनचालक हैराण
सांगोला | प्रतिनिधी सांगोला शहरातील प्रमुख रस्त्यांची अवस्था दिवसेंदिवस अधिकच खराब होत असून,
खड्ड्यांचे प्रमाण वाढल्याने नागरिक आणि वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
त्यातच शहरातील काही भागांत निकषांचे पालन न करता उभारण्यात आलेल्या मोठ्या
व उंच गतिरोधकांमुळे वाहनधारकांचा प्रवास अधिकच धोकादायक बनला आहे.
अनेक ठिकाणी रस्त्यांवर मोठे खड्डे असल्याने दुचाकीस्वारांचा तोल जाण्याच्या घटना घडत आहेत.
पावसामुळे खड्ड्यांमध्ये पाणी साचत असल्याने त्यांचा अंदाज येत नाही, परिणामी अपघाताची शक्यता वाढली आहे.
दुसरीकडे, आवश्यक मापदंडांचा विचार न करता उभारण्यात आलेल्या गतिरोधकांमुळे चारचाकी वाहनांचेही नुकसान होत असल्याची तक्रार नागरिकांनी व्यक्त केली आहे.
स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे की, रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करण्याबरोबरच शहरातील सर्व गतिरोधकांचे
तांत्रिक परीक्षण करून नियमबाह्य व अवैज्ञानिक गतिरोधक हटविणे किंवा त्यामध्ये आवश्यक सुधारणा करणे गरजेचे आहे.
दरम्यान, नागरिकांनी संबंधित प्रशासन आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने या समस्येची गंभीर दखल घेऊन रस्त्यांची दुरुस्ती,
खड्डे बुजविणे तसेच मानकांनुसार गतिरोधकांची उभारणी करण्यासाठी तातडीने कार्यवाही करावी, अशी जोरदार मागणी केली आहे.


0 Comments