Breaking News

गौडवाडीच्या विकासासाठी शशिकांत हातेकर यांचे रणशिंग; ग्रामपंचायत निवडणुकीत उतरणार, विकासाचा अजेंडा जाहीर

गौडवाडीच्या विकासासाठी शशिकांत हातेकर यांचे रणशिंग; ग्रामपंचायत निवडणुकीत उतरणार, विकासाचा अजेंडा जाहीर


सांगोला (प्रतिनिधी): गौडवाडी ग्रामपंचायतीच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गावातील राजकीय हालचालींना वेग आला असून, सामाजिक कार्यकर्ते शशिकांत हातेकर यांनी ग्रामपंचायत निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे.

 गावातील रखडलेली विकासकामे पूर्ण करून गौडवाडीला आदर्श गाव बनवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. त्यांच्या उमेदवारीमुळे ग्रामस्थ आणि विशेषतः युवकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

शशिकांत हातेकर यांनी अनेक वर्षांपासून गावातील सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेतला आहे. ग्रामविकासाला प्राधान्य देत त्यांनी पाणी, रस्ते, शिक्षण, आरोग्य, रोजगार आणि महिला सक्षमीकरण या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करण्याचा संकल्प व्यक्त केला आहे. 

"सत्तेपेक्षा गावाचा विकास महत्त्वाचा असून, प्रत्येक नागरिकाला विकासाच्या प्रवाहात सहभागी करून घेण्याचा आमचा प्रयत्न राहील," असे त्यांनी सांगितले.

ग्रामस्थांसमोर मांडलेल्या विकास आराखड्यात शेतीसाठी आणि पिण्याच्या पाण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना, जिल्हा परिषद शाळेचा दर्जा उंचावणे, गावात आरोग्य सुविधा वाढवणे, तरुणांसाठी स्वयंरोजगार

 आणि क्रीडा सुविधा उपलब्ध करून देणे, महिला बचत गटांना सक्षम करणे तसेच अंतर्गत रस्ते, सांडपाणी व्यवस्थापन आणि पथदिव्यांसारख्या मूलभूत सुविधांचा विकास करण्यावर भर देण्यात आला आहे.

हातेकर यांच्या उमेदवारीची घोषणा होताच गावातील युवक, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांनी त्यांचे स्वागत केले. गावाला विकासाभिमुख, लोकाभिमुख आणि सर्वांना सोबत घेऊन काम करणारे नेतृत्व मिळावे, अशी अपेक्षा अनेक ग्रामस्थांनी व्यक्त केली.

यंदाची गौडवाडी ग्रामपंचायत निवडणूक विकासाच्या मुद्द्यांवर रंगण्याची शक्यता असून, शशिकांत हातेकर यांच्या उमेदवारीमुळे निवडणुकीत नवे समीकरण निर्माण होण्याची चर्चा गावात सुरू झाली आहे.

Post a Comment

0 Comments