विठ्ठल दर्शनाचा प्रवास ठरला अखेरचा! महूद-दिघंची मार्गावर दूध टँकरच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू, एक गंभीर
सांगोला | प्रतिनिधी पंढरपूर येथे श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी निघालेल्या दोन भाविकांवर काळाने घाला घातला. सांगोला तालुक्यातील महूद–दिघंची मार्गावरील लोखंडे यांच्या
वजनकाट्यासमोर दूध टँकर आणि दुचाकीची भीषण धडक होऊन एका दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला, तर मागे बसलेला सहप्रवासी गंभीर जखमी झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मृत अमरसिंह विजयसिंह पवार (वय ५७, रा. चितळी, ता. खटाव, जि. सातारा) हे रविवारी (१२ जुलै) सकाळी त्यांच्या केए-०४/ईडी-२३११ क्रमांकाच्या दुचाकीवरून
पंढरपूरच्या विठ्ठल दर्शनासाठी निघाले होते. त्यांच्या सोबत शिवाजी निवृत्ती पवार हे प्रवास करत होते.
दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास महूद–दिघंची मार्गावरील लोखंडे यांच्या वजनकाट्यासमोर एमएच-११/डीडी-२४५१ क्रमांकाचा दूध टँकर अचानक चुकीच्या दिशेने वजनकाट्याकडे वळल्याने समोरून येणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक बसली.
या भीषण अपघातात अमरसिंह पवार यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर शिवाजी पवार गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर पंढरपूर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या घटनेप्रकरणी मृताचे चुलत भाऊ संजय तानाजी पवार (रा. चितळी, ता. खटाव) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सांगोला पोलिस ठाण्यात दूध टँकर चालक
सोमनाथ मारुती नाळे (रा. विडणी, ता. फलटण, जि. सातारा) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.


0 Comments