Breaking News

ऑक्टोबरमध्ये ७०२ ग्रामपंचायतींची रणधुमाळी; ४ ऑगस्टला अंतिम मतदार यादी, सरपंचांची निवड थेट जनतेतून

ऑक्टोबरमध्ये ७०२ ग्रामपंचायतींची रणधुमाळी; ४ ऑगस्टला अंतिम मतदार यादी, सरपंचांची निवड थेट जनतेतून


सोलापूर | प्रतिनिधी राज्यातील मुदत संपलेल्या तसेच नव्याने स्थापन झालेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकांची तयारी वेगाने सुरू झाली असून, ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये निवडणुका होण्याची शक्यता आहे.

 यावेळी सरपंचांची निवड थेट जनतेतून होणार असून, निवडणुकीसाठी १५ एप्रिल २०२६ रोजीची विधानसभा मतदार यादी आधार म्हणून वापरली जाणार आहे.

राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार ग्रामपंचायत मतदार याद्या संगणकीकृत पद्धतीने तयार केल्या जाणार आहेत. २४ जुलै रोजी प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जातील.

 त्यानंतर २४ ते २९ जुलै या कालावधीत मतदारांना हरकती व सूचना नोंदविता येणार असून, त्यांची छाननी झाल्यानंतर ४ ऑगस्ट रोजी अंतिम मतदार याद्या जाहीर केल्या जातील.

मतदार यादी तयार करण्यासाठी महाआयटीने विकसित केलेल्या विशेष सॉफ्टवेअरचा वापर करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत 

तालुकास्तरावर युजर आयडी व पासवर्ड उपलब्ध करून देण्यात येणार असून, प्रत्येक ग्रामपंचायतीची प्रभागनिहाय माहिती प्रणालीमध्ये भरली जाणार आहे.

तहसीलदारांकडून विधानसभा मतदार यादीतील मतदारांची संख्या आणि ग्रामपंचायतीच्या प्रभागनिहाय मतदार यादीतील संख्या यांची पडताळणी केली जाणार आहे.

 ग्रामपंचायतीच्या हद्दीतील सर्व पात्र मतदारांचा समावेश झाला आहे आणि बाहेरील कोणताही मतदार यादीत आलेला नाही, याची खात्री करण्यात येणार आहे.

या टप्प्यात राज्यातील सुमारे १५,३०० ग्रामपंचायतींमध्ये निवडणुका होण्याची शक्यता असून, सोलापूर जिल्ह्यातील १,०२७ ग्रामपंचायतींपैकी ७०२ ग्रामपंचायती निवडणूक प्रक्रियेत सहभागी होणार आहेत.

सोलापूर जिल्ह्यातील निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायती :

बार्शी – १००

माढा – ८५

पंढरपूर – ७८

अक्कलकोट – ७७

मोहोळ – ७६

सांगोला – ६७

माळशिरस – ५७

करमाळा – ५४

दक्षिण सोलापूर – ५४

मंगळवेढा – ३०

उत्तर सोलापूर – २४

महत्त्वाच्या तारखा

२४ जुलै: प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध

२४ ते २९ जुलै: हरकती व सूचना स्वीकारल्या जाणार

४ ऑगस्ट: अंतिम मतदार यादी जाहीर

यामुळे ग्रामपंचायत निवडणुकांची औपचारिक तयारी सुरू झाली असून, इच्छुक उमेदवार आणि मतदारांनी मतदार यादी तपासून आवश्यक दुरुस्त्या वेळेत करून घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments