१२वी उत्तीर्ण महिलांसाठी सुवर्णसंधी! महाराष्ट्रातील अंगणवाड्यांमध्ये मोठी भरती; सोलापूर जिल्ह्यात १७६ जागा
मुंबई / सोलापूर : राज्यातील १२वी उत्तीर्ण महिलांसाठी महिला व बालविकास विभागाने मोठी रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली आहे.
महाराष्ट्रभरातील अंगणवाड्यांमध्ये सेविका आणि मदतनीस पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू होत असून, राज्यातील १,०१५ अंगणवाडी सेविका आणि ३,९२८ मदतनीस अशी एकूण ४,९४३ रिक्त पदे भरली जाणार आहेत.
या भरतीमध्ये सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक १७६ पदे उपलब्ध असून, त्यामध्ये ६१ अंगणवाडी सेविका आणि ११५ अंगणवाडी मदतनीस पदांचा समावेश आहे.
जिल्ह्यातील अक्कलकोट, बार्शी, वैराग, करमाळा, माढा, टेंभुर्णी, माळशिरस, अकलूज, मंगळवेढा, मोहोळ, उत्तर सोलापूर, पंढरपूर, सांगोला, कोळा आणि दक्षिण सोलापूर या प्रकल्पांमध्ये भरती होणार आहे.
भरतीसाठी इच्छुक महिलांकडून २० जुलै ते ३१ जुलै या कालावधीत अर्ज स्वीकारले जाणार आहेत. त्यानंतर ३ ते ७ ऑगस्ट दरम्यान अर्जांची छाननी होईल.
१० ते १२ ऑगस्ट या कालावधीत गुणवत्ता यादीची पडताळणी करण्यात येईल. प्राथमिक यादीवर हरकती व आक्षेप नोंदविण्यासाठी १३ ते २६ ऑगस्ट ही मुदत देण्यात आली आहे.
सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर २७ ऑगस्ट रोजी अंतिम गुणवत्ता यादी जाहीर करून नियुक्तीपत्रे वितरित करण्यात येणार आहेत.
पात्रता आणि वयोमर्यादा
अंगणवाडी मदतनीस पदासाठी उमेदवार किमान १२वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. संबंधित नगर परिषद, नगर पंचायत किंवा नगरपालिका क्षेत्रातील
स्थानिक रहिवासी महिलांनाच अर्ज करता येणार असून, रहिवासी पुरावा, आधार कार्ड, रेशन कार्ड, डोमिसाईल किंवा रहिवासी प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे.
उमेदवाराचे वय जाहिरात प्रसिद्धीच्या दिवशी १८ ते ३५ वर्षे असावे. विधवा महिलांसाठी कमाल वयोमर्यादा ४० वर्षे निश्चित करण्यात आली आहे.
निवड प्रक्रिया कशी होणार?
शैक्षणिक गुणवत्तेनुसार उमेदवारांना ८० गुण दिले जाणार आहेत. १२वी, पदवी, पदव्युत्तर, डी.एड., बी.एड., एमएस-सीआयटी किंवा समकक्ष संगणक अभ्यासक्रमाच्या आधारे गुणांकन केले जाईल.
याशिवाय विधवा, अनाथ, अनुसूचित जाती-जमाती, इतर मागास प्रवर्ग तसेच अंगणवाडीतील अनुभव असलेल्या उमेदवारांना अतिरिक्त २० गुण दिले जाणार आहेत.
मानधन किती मिळणार?
निवड झालेल्या अंगणवाडी सेविकांना दरमहा १३ हजार रुपये, तर मदतनीसांना ७ हजार ५०० रुपये मानधन देण्यात येणार आहे.
कामाची जबाबदारी
अंगणवाडी सेविकांवर बालकांचे पूर्वप्राथमिक शिक्षण, गरोदर व स्तनदा मातांची नोंद, पोषण आहार वितरण, बालकांच्या आरोग्याची देखरेख, पोषण ट्रॅकरवर माहिती नोंदविणे आणि शासनाच्या विविध योजनांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी असेल.
मदतनीसांना अंगणवाडीचे दैनंदिन कामकाज, बालकांच्या शिक्षणात सहाय्य, वजन-उंची नोंदी ठेवणे आणि सेविकांना विविध कामांमध्ये मदत करण्याची जबाबदारी पार पाडावी लागणार आहे.
सरकारी सेवेत काम करण्याची इच्छा असलेल्या आणि आवश्यक पात्रता पूर्ण करणाऱ्या महिलांसाठी ही भरती मोठी संधी मानली जात आहे.
इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी संबंधित अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचून आवश्यक कागदपत्रांसह वेळेत अर्ज सादर करावा.


0 Comments