शेकापच्या राज्य सोशल मीडिया कोअर कमिटीवर सांगोल्याचे वर्चस्व;
चंद्रकांत सरतापे आणि प्रा. एन. डी. बंडगर यांच्यावर राज्यस्तरीय जबाबदारी
सांगोला : शेतकरी कामगार पक्षाच्या राज्य सोशल मीडिया कोअर कमिटीवर सांगोला तालुक्यातील दोन सक्रिय आणि अभ्यासू कार्यकर्त्यांची निवड झाल्याने तालुक्याच्या राजकीय व संघटनात्मक क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. भाई चंद्रकांत सरतापे
आणि प्रा. एन. डी. बंडगर यांच्यावर पक्षाने राज्यस्तरीय जबाबदारी सोपविली असून, त्यांच्या माध्यमातून शेकापची विचारधारा अधिक प्रभावीपणे राज्यभर पोहोचणार असल्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
शेतकरी कामगार पक्षाचे राज्य सरचिटणीस तथा माजी आमदार भाई जयंत पाटील यांच्या आदेशानुसार, आमदार डॉ. भाई बाबासाहेब देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली
राज्य सोशल मीडिया प्रमुख सौ. चित्रलेखा पाटील यांनी या नियुक्त्या जाहीर केल्या. निवडीचे अधिकृत नियुक्तीपत्र कु. सम्या कोरडे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
भाई चंद्रकांत सरतापे यांनी अनेक वर्षांपासून सोशल मीडियाच्या माध्यमातून शेकापची विचारधारा जनतेपर्यंत पोहोचविण्याचे सातत्यपूर्ण कार्य केले आहे.
पक्षाची धोरणे, स्व. आबासाहेब यांच्या विचारांचा वारसा तसेच आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या विकासकामांची माहिती प्रभावीपणे लोकांपर्यंत पोहोचविण्यात त्यांचे विशेष योगदान राहिले आहे.
प्रा. एन. डी. बंडगर हे अभ्यासू व्यक्तिमत्त्व, प्रभावी वक्ते आणि पक्षाच्या भूमिकेचे सशक्त मांडणीकार म्हणून ओळखले जातात. सोशल मीडियाच्या माध्यमातून पक्षाची भूमिका,
जनतेशी संवाद आणि विकासकामांची माहिती व्यापक स्तरावर पोहोचविण्यात त्यांनीही महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.
या दोन्ही कार्यकर्त्यांच्या नियुक्तीमुळे राज्यभर शेकापच्या सोशल मीडिया संघटनेला अधिक बळ मिळणार असून, पक्षाच्या विचारांचा प्रचार-प्रसार नव्या जोमाने होईल, असा विश्वास पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
या निवडीबद्दल आमदार डॉ. भाई बाबासाहेब देशमुख, सौ. निकिताताई देशमुख, पक्षाचे चिटणीस दादाशेठ बाबर, पुरोगामीचे तालुकाध्यक्ष दीपक गोडसे,
शहर चिटणीस विजय राऊत यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समर्थकांनी भाई चंद्रकांत सरतापे व प्रा. एन. डी. बंडगर यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.


0 Comments