दुष्काळी सांगोल्यासाठी पुराचे पाणी वळवा; अन्यथा उग्र जनआंदोलनाचा इशारा माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील
यांची सरकारकडे मागणी; २७ जुलै रोजी तहसीलदारांना निवेदन
सांगोला | तालुका प्रतिनिधी राज्यातील अनेक नद्यांना अतिवृष्टीमुळे महापूर आला असताना, कायम दुष्काळाच्या छायेत असलेल्या सांगोला तालुक्यात मात्र पाण्याचा तीव्र तुटवडा निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर टेंभू, म्हैसाळ आणि
नीरा उजवा कालवा योजनांमधून अतिरिक्त पुराचे पाणी माण, कोरडा नदी तसेच तालुक्यातील ओढे, नाले आणि तलावांमध्ये तातडीने सोडावे, अन्यथा तीव्र जनआंदोलन छेडले जाईल, असा इशारा माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांनी दिला आहे.
या मागणीसाठी सोमवार, दि. २७ जुलै रोजी माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील आपल्या सहकाऱ्यांसह सांगोला तहसीलदारांना निवेदन देणार असून, त्यानंतर शासनाच्या भूमिकेनुसार आंदोलनाची पुढील दिशा निश्चित करण्यात येणार आहे.
सध्या कृष्णा, कोयना, पंचगंगा, भीमा आणि नीरा नदी खोऱ्यात मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात पूरस्थिती निर्माण झाली आहे. या नद्यांतील अतिरिक्त पाणी दुष्काळी भागाकडे वळविण्यासाठी यापूर्वी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेऊन मागणी करण्यात आली होती.
त्यावेळी सकारात्मक प्रतिसाद मिळाला असला, तरी अद्याप प्रत्यक्ष कार्यवाही झालेली नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
यंदा अपुऱ्या पावसामुळे सांगोला तालुक्यातील खरीप हंगाम जवळपास उद्ध्वस्त झाला आहे. भूजल पातळी मोठ्या प्रमाणात घसरल्याने विहिरी,
कूपनलिका आणि तलाव कोरडे पडले आहेत. त्यामुळे पिण्याचे पाणी, जनावरांचा चारा आणि शेतीसाठी आवश्यक पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चालला आहे.
या संकटावर उपाय म्हणून टेंभू योजनेतून मानगंगा नदीत, तर म्हैसाळ योजनेतून कोरडा नदीत पाणी सोडून सर्व बंधारे भरावेत, तसेच नीरा उजवा कालव्यातूनही दुष्काळी भागातील नद्या, नाले,
ओढे आणि तलावांना पाणीपुरवठा करावा, अशी आग्रही मागणी माजी आमदार साळुंखे पाटील यांनी केली आहे. यामुळे सांगोला तालुक्यातील पाणीटंचाई कमी होऊन शेती आणि पशुधनाला मोठा दिलासा मिळेल, असा त्यांचा विश्वास आहे.
दोन महिने उलटूनही समाधानकारक पाऊस न झाल्याने शेतकरी हवालदिल झाला असून, शासनाने तातडीने निर्णय न घेतल्यास शेतकऱ्यांच्या हक्कासाठी व्यापक व तीव्र आंदोलन उभारण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.
चौकट
निवेदनानंतर आंदोलनाची दिशा ठरणार
सांगोला तालुक्यातील पाणीप्रश्नावर सोमवार, दि. २७ जुलै रोजी तहसीलदारांना लेखी निवेदन सादर करण्यात येणार आहे. शासन व प्रशासनाकडून सकारात्मक निर्णय
न झाल्यास पुढील काळात आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, अशी माहिती ज्येष्ठ नेते तानाजीकाका पाटील यांनी दिली.


0 Comments