आषाढी यात्रेच्या बंदोबस्तादरम्यान एसआरपीएफ जवानाची आत्महत्या; पंढरपूर हादरले, डोक्यात गोळी झाडून जीवनयात्रा संपवली
पंढरपूर | प्रतिनिधी आषाढी एकादशी यात्रेमुळे लाखो भाविकांच्या गर्दीने गजबजलेल्या पंढरपूरमध्ये शनिवारी पहाटे एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली.
यात्रेच्या बंदोबस्तासाठी नियुक्त असलेल्या राज्य राखीव पोलिस दल (एसआरपीएफ) जवानाने स्वतःच्या शासकीय रिव्हॉल्व्हरमधून डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केल्याने पोलिस दलासह संपूर्ण शहरात हळहळ व्यक्त होत आहे.
मृत जवानाचे नाव रामेश्वर ध्रुपद साबणे असून ते मूळचे परभणी जिल्ह्यातील गंगाखेड येथील रहिवासी होते. ते संभाजीनगर येथील एसआरपीएफ तुकडीत कार्यरत होते. आषाढी यात्रेच्या बंदोबस्तासाठी ते गेल्या तीन-चार दिवसांपासून पंढरपूरमध्ये तैनात होते.
आज पहाटे सुमारे २.३० वाजण्याच्या सुमारास कासेगाव रोडवरील मुक्कामाच्या ठिकाणी त्यांनी स्वतःच्या शासकीय रिव्हॉल्व्हरमधून डोक्यात गोळी झाडली. गोळीबाराचा आवाज ऐकताच सहकारी घटनास्थळी धावले; मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता.
या घटनेमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. प्राथमिक माहितीनुसार कामाचा ताण किंवा वैयक्तिक कारणांचा तपास केला जात असून,
आत्महत्येमागील कारणांचा सर्व बाजूंनी शोध घेतला जात आहे. पंढरपूर शहर पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे.
या दुर्दैवी घटनेमुळे आषाढी यात्रेच्या बंदोबस्तावर असलेल्या पोलिस दलात शोककळा पसरली असून, सहकाऱ्यांनी रामेश्वर साबणे यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.


0 Comments