Breaking News

मयत कर्जदाराच्या खात्यातील रक्कम वळवल्याचा आरोप; चौकशी न झाल्यास १५ ऑगस्टपासून उपोषणाचा इशारा सहकार मंत्र्यांकडे निवेदन; शेरेवाडी विकास सेवा सोसायटीच्या कारभारावर गंभीर आरोप

मयत कर्जदाराच्या खात्यातील रक्कम वळवल्याचा आरोप; चौकशी न झाल्यास १५ ऑगस्टपासून उपोषणाचा इशारा


सहकार मंत्र्यांकडे निवेदन; शेरेवाडी विकास सेवा सोसायटीच्या कारभारावर गंभीर आरोप

आटपाडी | प्रतिनिधी आटपाडी तालुक्यातील शेरेवाडी विकास सेवा सोसायटीच्या कारभारावर गंभीर आरोप करत संबंधित चेअरमन व सचिवाविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी युवक नेते मच्छिंद्र बोराडे आणि गणेश बोराडे यांनी केली आहे. 

या संदर्भात राज्याचे सहकार मंत्री व संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे लेखी निवेदन सादर करण्यात आले असून, कारवाई न झाल्यास १५ ऑगस्ट २०२६ पासून बेमुदत उपोषण करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

निवेदनात नमूद केल्यानुसार, सोसायटीचे कर्जदार सभासद कै. सुधीर नानासो बोराडे यांचे ६ जानेवारी २०२१ रोजी निधन झाले. 

त्यानंतर त्यांच्या सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या दिघंची शाखेतील खात्यातील रक्कम ३० जून २०२५ रोजी वारसांची पूर्वसंमती अथवा माहिती न देता शेरेवाडी विकास सेवा सोसायटीच्या नावे वर्ग करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.

तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार, ही रक्कम संबंधित कर्ज खात्यात जमा करण्यात आलेली नसून तिचा कथित गैरवापर करण्यात आला आहे. तसेच बँकेशी कथित खोटा पत्रव्यवहार करून व्यवहार पूर्ण करण्यात आल्याचा

 आरोपही निवेदनात करण्यात आला आहे. याशिवाय मयत सभासदाच्या खात्यावर जमा झालेल्या पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या रकमेचाही अपहार झाल्याचा दावा करण्यात आला आहे.

या व्यवहारासंदर्भात कोणतीही अधिकृत पावती देण्यात आली नसल्याचा तसेच वारसांना विश्वासात न घेता संपूर्ण प्रक्रिया पार पडल्याचा आरोप करत संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.

निवेदनात शेरेवाडी विकास सेवा सोसायटीच्या एकूण कारभारावरही प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. पात्र शेतकऱ्यांना सभासदत्व नाकारले जात असल्याचा,

 मनमानी कारभार, भ्रष्टाचार आणि राजकीय हस्तक्षेप होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या संदर्भात सहा जणांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्याचेही नमूद करण्यात आले आहे.

दरम्यान, या सर्व आरोपांची तातडीने चौकशी करून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अन्यथा १५ ऑगस्टपासून बेमुदत उपोषण सुरू करण्यात येईल, असा इशारा मच्छिंद्र बोराडे आणि गणेश बोराडे यांनी दिला आहे.

टीप : या बातमीत नमूद करण्यात आलेले सर्व आरोप तक्रारदारांनी संबंधित अधिकाऱ्यांकडे दिलेल्या निवेदनावर आधारित असून, संबंधित चेअरमन, सचिव किंवा सोसायटीची अधिकृत बाजू उपलब्ध झाल्यानंतर तीही प्रसिद्ध करण्यात येईल.

Post a Comment

0 Comments