Breaking News

निजामपूरात अवैध देशी दारू विक्रीवर सांगोला पोलिसांचा धडक छापा; १२ संत्रा कंपनीच्या बाटल्या जप्त, पुणे येथील व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल

 


निजामपूरात अवैध देशी दारू विक्रीवर सांगोला पोलिसांचा धडक छापा; १२ संत्रा कंपनीच्या बाटल्या जप्त, पुणे येथील व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल

 


सांगोला प्रतिनिधी सांगोला तालुक्यातील निजामपूर येथे अवैधरीत्या देशी दारूची विक्री करणाऱ्या व्यक्तीवर सांगोला पोलिसांनी धडक कारवाई करत १२ संत्रा कंपनीच्या सिलबंद देशी दारूच्या बाटल्या जप्त केल्या. या प्रकरणी महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५ (ई) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी आरोपीविरुद्ध पुढील तपास सुरू केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस निरीक्षक राहुल देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली दारूबंदीविरोधी विशेष मोहिम राबविण्यात येत होती. 

त्याअंतर्गत सहाय्यक पोलीस निरीक्षक मोरे, ग्रेड पोलीस उपनिरीक्षक राऊत, पोहेकॉ. १३६ शेख आणि पोलीस कॉन्स्टेबल दीपक अशोक शिंदे हे घेरडी दुर्गक्षेत्र हद्दीत गस्त घालत होते.

दरम्यान, बातमीदारामार्फत निजामपूर ते मानेगाव रस्त्यालगत एका घराच्या आडोशाला चिलारीच्या झाडाजवळ एक व्यक्ती विनापरवाना देशी दारू विक्री करत 

असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. माहितीची खातरजमा करण्यासाठी पंचांना सोबत घेऊन पोलिसांनी घटनास्थळी छापा टाकला.

छाप्यावेळी एक इसम पांढऱ्या रंगाची नायलॉनची पिशवी घेऊन बसलेला आढळून आला. संशयावरून त्याला ताब्यात घेऊन पंचांसमक्ष पिशवीची झडती घेतली 

असता त्यामध्ये संत्रा कंपनीच्या १८० मिली क्षमतेच्या १२ सिलबंद देशी दारूच्या बाटल्या आढळून आल्या. प्रत्येकी ८० रुपये किंमतीच्या या बाटल्यांची एकूण किंमत ९६० रुपये असल्याचे निष्पन्न झाले.

चौकशीत आरोपीने आपले नाव दत्तात्रय पांडुरंग खांडेकर (वय ४५), रा. समर्थ कॉलनी, कोथरूड, पुणे, सध्या निजामपूर, ता. सांगोला असे सांगितले. 

जप्त केलेल्या मालातून एक बाटली रासायनिक विश्लेषणासाठी नमुना म्हणून सीलबंद करण्यात आली असून उर्वरित माल पंचनामा करून जप्त करण्यात आला.

या प्रकरणी पो. कॉ. दीपक अशोक शिंदे यांनी सरकारतर्फे फिर्याद दिली असून, आरोपी दत्तात्रय पांडुरंग खांडेकर याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५ (ई) अन्वये सांगोला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सांगोला पोलीस अवैध दारू विक्री, वाहतूक आणि साठा करणाऱ्यांविरोधात सातत्याने कठोर कारवाई करत असून, अशा बेकायदेशीर धंद्यांना कोणतीही पाठीशी घातली जाणार नसल्याचा स्पष्ट इशारा

 पोलिसांनी दिला आहे. नागरिकांनीही आपल्या परिसरात अवैध दारू विक्री किंवा इतर बेकायदेशीर प्रकार सुरू असल्यास त्वरित पोलिसांना माहिती देऊन सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments