Breaking News

सांगोल्यात वनविभागाची धडक कारवाई; विनापरवाना वृक्षतोड प्रकरणी आयशरसह 9.89 घनमीटर लिंबाचे लाकूड जप्त

सांगोल्यात वनविभागाची धडक कारवाई; विनापरवाना वृक्षतोड प्रकरणी आयशरसह 9.89 घनमीटर लिंबाचे लाकूड जप्त


सांगोला | प्रतिनिधी सांगोला तालुक्यातील अवैध वृक्षतोडीवर वनविभागाने मोठा आळा घालण्याच्या उद्देशाने धडक कारवाई करत विनापरवाना तोडण्यात आलेले 9.89 घनमीटर लिंबाचे जळाऊ लाकूड

 आणि ते वाहून नेणारा आयशर (MH 11 AL 3258) जप्त केला आहे. या प्रकरणी वनअपराध प्रथम गुन्हा क्र. ओ-01/2026 दाखल करण्यात आला असून संबंधितांविरुद्ध वनकायद्यानुसार पुढील प्रक्रिया सुरू आहे.

दि. 19 जुलै 2026 रोजी जुनोनी-माळवाडी परिसरात नियमित गस्तीदरम्यान वनविभागाच्या पथकाला एका खासगी क्षेत्रात लिंबाच्या झाडांची तोड करून लाकूड आयशर वाहनात भरले जात असल्याचे आढळले. 

वनकर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन तपासणी केली असता संबंधितांकडे वृक्षतोड परवाना तसेच लाकूड वाहतुकीसाठी आवश्यक असलेला अधिकृत वाहतूक पास नसल्याचे स्पष्ट झाले.

यानंतर वनविभागाने संपूर्ण लाकूडसाठा आणि वाहन ताब्यात घेत जप्तीची कारवाई केली. आवश्यक पंचनामा व कागदपत्रांची पूर्तता करून जप्त माल सांगोला वनपरिक्षेत्र कार्यालयात आणण्यात आला.

नियम मोडणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा

वनपरिक्षेत्र अधिकारी सागर विलास मगर यांनी सांगितले की, वनविभागाची पूर्वपरवानगी आणि अधिकृत वाहतूक पासशिवाय कोणतीही वृक्षतोड किंवा लाकूड वाहतूक करणे

 बेकायदेशीर असून अशा प्रकारांना कोणतीही सवलत दिली जाणार नाही. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशाराही त्यांनी दिला.

सांगोला हा दुष्काळग्रस्त तालुका असल्याने पर्यावरण संतुलनासाठी प्रत्येक झाड महत्त्वाचे आहे. त्यामुळे नागरिकांनी वृक्षसंवर्धनाला प्राधान्य द्यावे, 

मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड करावी आणि झाड तोडण्याची आवश्यकता असल्यास वनविभागाची विधिवत परवानगी घेऊनच पुढील प्रक्रिया करावी, असे आवाहन त्यांनी केले.

नागरिकांना सहकार्याचे आवाहन

वनक्षेत्रात किंवा खासगी मालकीच्या जागेत कुठेही अवैध वृक्षतोड अथवा विनापरवाना लाकूड वाहतूक होत असल्याचे आढळल्यास नागरिकांनी त्वरित वनविभागाला माहिती देऊन सहकार्य करावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.

ही कारवाई उपवनसंरक्षक कुलराज सिंह आणि सहायक वनसंरक्षक (कॅम्पा) ए. बी. शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. कारवाईत वनपरिक्षेत्र अधिकारी सागर विलास मगर, वनपाल एस. ए. घावटे आणि वनरक्षक एस. व्ही. नरळे यांनी सक्रिय सहभाग नोंदवला.

Post a Comment

0 Comments