आदमापूर बाळूमामा देवस्थानातील ६०.७५ कोटींच्या कथित गैरव्यवहाराप्रकरणी गुन्हा दाखल; विश्वस्त, अधिकारी आणि कंत्राटदार चौकशीच्या फेऱ्यात
गारगोटी | प्रतिनिधी महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा आणि मध्य प्रदेशातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या आदमापूर (ता. भुदरगड) येथील सद्गुरू बाळूमामा देवस्थानातील तब्बल ६० कोटी ७५ लाख २८ हजार ६० रुपयांच्या कथित आर्थिक गैरव्यवहारामुळे राज्यभरात खळबळ उडाली आहे.
या प्रकरणी भुदरगड पोलिस ठाण्यात विविध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे.
धर्मादाय आयुक्त, मुंबई कार्यालयाचे निरीक्षक राजेंद्र रंगराव गडकरी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तत्कालीन निरीक्षक तथा कार्याध्यक्ष रागिणी झुंजारराव खडके, सचिव रावसाहेब कोणकेरी, संबंधित विश्वस्त, कंत्राटदार, व्यापारी आणि इतर संबंधितांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
प्राथमिक माहितीनुसार, मार्च २०२० ते मार्च २०२६ या कालावधीत देवस्थानाच्या आर्थिक व्यवहारांमध्ये संगनमत करून निधीचा अपहार करण्यात आल्याचा आरोप आहे. तसेच बनावट कागदपत्रांची निर्मिती, विश्वासघात, फसवणूक आणि पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न झाल्याचाही आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.
आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहितेतील फसवणूक, विश्वासघात, बनावट कागदपत्रे तयार करणे व त्यांचा वापर करणे, तसेच कट रचल्यासंबंधीच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कथित गैरव्यवहाराची रक्कम ६०.७५ कोटी रुपये इतकी असल्याचे तपास यंत्रणांनी नमूद केले आहे.
तपासाची व्याप्ती वाढण्याची शक्यता
या प्रकरणाचा तपास अधिक व्यापक होण्याची शक्यता असून देवस्थानाच्या आर्थिक व्यवहारांशी संबंधित कागदपत्रे, लेखापरीक्षण अहवाल, बँक व्यवहार आणि इतर पुराव्यांची सखोल छाननी केली जाणार आहे. तपासादरम्यान आणखी काही व्यक्तींची नावे समोर येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
पोलिस उपनिरीक्षक अलीम मुल्ला यांनी तपासाची व्याप्ती लक्षात घेऊन हा तपास आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे (Economic Offences Wing) वर्ग करण्यात आल्याची माहिती दिली आहे. या घडामोडींमुळे राज्यभरातील भाविकांचे लक्ष आता या तपासाकडे लागले आहे.


0 Comments