अंगाला दगड बांधून विहिरीत उडी; अजनाळेतील २५ वर्षीय तरुणाची दुर्दैवी आत्महत्या
सांगोला | प्रतिनिधी सांगोला तालुक्यातील अजनाळे येथे एका २५ वर्षीय विवाहित तरुणाने अंगाला टॉवेलमध्ये दगड बांधून विहिरीत उडी घेत
आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना रविवारी (दि. ...) सायंकाळी उघडकीस आली.
या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत असून आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
मृत तरुणाचे नाव कालिदास अण्णा इंगोले (वय २५, रा. अजनाळे) असे आहे. याप्रकरणी त्यांचे चुलते गिरीधर नाथबाबा इंगोले यांनी सांगोला पोलिस ठाण्यात खबर दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कालिदास इंगोले हा मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. रविवारी सकाळी सुमारे नऊ वाजण्याच्या
सुमारास तो पत्नी पूजा हिला कोणतीही कल्पना न देता घराबाहेर पडला. दरम्यान, त्याचे आई-वडील आषाढी वारीनिमित्त पंढरपूर येथे खेळणी विक्रीसाठी गेले होते.
सायंकाळपर्यंत कालिदास घरी न परतल्याने कुटुंबीयांनी त्याच्या मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला.
मोबाईलची रिंग वाजत होती; मात्र प्रतिसाद मिळत नव्हता. त्यामुळे नातेवाईकांनी गावात शोध सुरू केला.
शोधादरम्यान श्रीरंग कोळवले यांच्या विहिरीजवळ कालिदासच्या चप्पल आणि मोबाईल आढळून आला. यानंतर कांतीलाल कोळवले यांनी विहिरीत शोध घेतला असता खोल पाण्यात कालिदास आढळला.
त्याला तातडीने बाहेर काढून सांगोला ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले; मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले.
प्राथमिक माहितीनुसार, कालिदासने टॉवेलमध्ये दगड बांधून तो अंगाला गुंडाळल्यानंतर विहिरीत उडी घेतल्याचे समोर आले आहे.
या घटनेचा पुढील तपास सांगोला पोलिस करत असून आत्महत्येमागील कारण अद्याप समजू शकलेले नाही.


0 Comments