सांगोला-मंगळवेढा महामार्गावर भीषण अपघात; वॉटर फिल्टर व्यावसायिकाचा जागीच मृत्यू
सांगोला | प्रतिनिधी सांगोला-मंगळवेढा महामार्गावरील पुजारी वस्ती परिसरात सोमवारी सकाळी झालेल्या मालट्रक
आणि दुचाकीच्या भीषण अपघातात वॉटर फिल्टर व्यवसाय करणाऱ्या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मृत तरुणाचे नाव सत्यप्रकाश नवनाथ पवार (वय ३४, रा. वाटंबरे, ता. सांगोला) असे आहे. ते वॉटर फिल्टर विक्री व दुरुस्तीचा व्यवसाय करत होते.
सोमवारी (२७ जुलै) सकाळी सुमारे १० वाजता ते स्वतःच्या एमएच-४५-व्ही-६६७८ क्रमांकाच्या दुचाकीवरून दुरुस्तीच्या कामासाठी सांगोला-मंगळवेढा मार्गाने जात होते.
दरम्यान, पुजारी वस्ती परिसरात त्यांच्या दुचाकीची आरजे-१९-जीके-६६६२ क्रमांकाच्या मालवाहू ट्रकशी जोरदार धडक झाली. या अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.
अपघातानंतर महामार्ग रुग्णवाहिकेचे कर्मचारी सिद्धेश्वर भोसले यांनी तत्काळ त्यांना सांगोला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.
मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी उपचार सुरू करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.
याप्रकरणी सांगोला ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. साळुंखे यांनी पोलिसांना खबर दिली असून,
सांगोला पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलिस हवालदार नितीन घुले करीत आहेत.


0 Comments