महुद-सांगोला मार्गावर भीषण अपघात; वृद्ध महिलेचा मृत्यू, मुलगा बचावला
सांगोला | प्रतिनिधी महुद-सांगोला मार्गावरील कॅनॉलजवळ दोन दुचाकींची समोरासमोर नसून पाठीमागून झालेली जोरदार धडक एका वृद्ध महिलेच्या जीवावर बेतली.
या अपघातात गंभीर जखमी झालेल्या निलावती अर्जुन इंगोले (वय ६०, रा. चिंचोली, हजारे वस्ती, ता. सांगोला) यांचा उपचार सुरू होण्यापूर्वीच मृत्यू झाला, तर त्यांचा मुलगा किरकोळ जखमी झाला.
ही घटना गुरुवार, १६ जुलै रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास महुद-सांगोला रस्त्यावरील कॅनॉलजवळ घडली. या प्रकरणी मृत महिलेचे पुत्र सुनील अर्जुन इंगोले यांनी २६ जुलै रोजी सांगोला पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
त्यानुसार पोलिसांनी तानाजी भीमराव खरात (रा. शिरभावी, मेटकरवाडी, ता. सांगोला) याच्याविरुद्ध निष्काळजीपणे वाहन चालविल्याप्रकरणी गुन्हा नोंदविला आहे.
फिर्यादीनुसार, सुनील इंगोले हे त्यांच्या आई निलावती इंगोले यांना दुचाकीवर मागे बसवून चिंचोली (हजारे वस्ती) येथून महुद-सांगोला मार्गाने सांगोल्याकडे जात होते.
त्यावेळी पाठीमागून भरधाव वेगाने येणाऱ्या दुसऱ्या दुचाकीने त्यांच्या वाहनाला जोरदार धडक दिली. धडकेमुळे निलावती इंगोले या रस्त्यावर कोसळून त्यांच्या डोक्यासह हात-पायाला गंभीर दुखापत झाली.
अपघातानंतर नातेवाईकांनी त्यांना तातडीने सांगोला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती त्यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे घोषित केले.
या घटनेचा पुढील तपास सांगोला पोलिस करीत आहेत.


0 Comments