कामाच्या दुहेरी ताणाने शिक्षणविश्व हादरले; खिलारवाडीच्या शिक्षिका उज्वला काळेल-खिलारे यांचे निधन
सांगोला | प्रतिनिधी सांगोला तालुक्यातील खिलारवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शिक्षिका उज्वला हनुमंत काळेल-खिलारे (वय ४३)
यांचे मेंदूतील रक्तस्त्रावानंतर उपचारादरम्यान निधन झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.
त्यांच्या निधनामुळे शिक्षण क्षेत्रात तसेच परिसरात शोककळा पसरली असून, अतिरिक्त प्रशासकीय कामाचा ताण आणि मानसिक दडपण याविषयी पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.
उज्वला काळेल-खिलारे या गेल्या सुमारे १९ वर्षांपासून खिलारवाडी अंतर्गत चौगुलेवस्ती येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत कार्यरत होत्या. अध्यापनासोबतच त्यांच्यावर शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) देण्याची जबाबदारी आली होती. शाळेचे काम, कुटुंबाची जबाबदारी
आणि ऑनलाइन अभ्यास अशा तिहेरी जबाबदाऱ्यांमध्ये त्या सातत्याने प्रयत्नशील होत्या. मात्र, टीईटीचा पेपर फुटल्याने परीक्षा रद्द झाल्यानंतर त्यांना पुन्हा तयारी करावी लागणार असल्याची चिंता सतावत होती.
याच काळात त्यांची खिलारवाडी येथील मतदान केंद्र क्रमांक ६६ साठी विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) मोहिमेत सहाय्यक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.
या कामाचा वाढलेला ताण, वरिष्ठांकडून येणाऱ्या सततच्या सूचना आणि वेळेत काम पूर्ण करण्याची धावपळ यामुळे त्या मानसिक दडपणाखाली असल्याचे सहकाऱ्यांनी सांगितले.
शनिवार, १८ जुलै रोजी शाळेचे काम पूर्ण करून त्यांनी एसआयआरचे कामही पूर्ण केले. सायंकाळी घरी परतल्यानंतर अचानक त्यांना रक्ताची उलटी झाली. त्यानंतर त्यांना महूद येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी पंढरपूर येथे हलविण्यात आले. उपचार सुरू असताना त्यांना दुसरा मेंदूचा झटका आला आणि त्या ब्रेन डेड झाल्या. अखेर मंगळवारी उपचारादरम्यान हृदयक्रिया बंद पडल्याने त्यांची प्राणज्योत मालवली.
उज्वला काळेल-खिलारे या विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय, कर्तव्यदक्ष आणि संवेदनशील शिक्षिका म्हणून ओळखल्या जात होत्या. त्यांच्या अकाली निधनामुळे शिक्षण क्षेत्रात हळहळ व्यक्त होत
असून, शिक्षकांवर वाढणाऱ्या प्रशासकीय कामाच्या ताणाबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
त्यांच्या पश्चात पती कमलाकर खिलारे (माध्यमिक शिक्षक) आणि दोन मुले असा परिवार आहे. मंगळवारी दुपारी खिलारवाडी येथील त्यांच्या शेतात शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.


0 Comments