बेकायदेशीर वीजजोडणीचा घातक प्रयोग; हलदहिवडीतील तरुणाचा मृत्यू, दोन महिन्यांनंतर दोघांवर गुन्हा
सांगोला | प्रतिनिधी सांगोला तालुक्यातील हलदहिवडी येथे बेकायदेशीर वीजजोडणी करताना करंट लागून
एका ३१ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याच्या प्रकरणात तब्बल दोन महिन्यांनंतर आईच्या फिर्यादीवरून दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वीजप्रवाह सुरू असतानाही कोणतीही सुरक्षा साधने उपलब्ध करून न देता तरुणाला विद्युत खांबावर चढविल्याचा गंभीर आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पांडुरंग वसंत माने (वय ३१) हे १९ मे २०२६ रोजी सकाळी घरी असताना गावातील अनिल गायकवाड यांनी त्यांना गणेश बिभिषण येडगे व योगेश हनुमंत मोरे यांनी इलेक्ट्रिक
मोटारीची केबल जोडण्यासाठी बोलावल्याचे सांगितले. आई रमाबाई माने यांनी त्यांना जाण्यास विरोध केला होता. मात्र, "क्षणात येतो," असे सांगून पांडुरंग घराबाहेर पडला.
हलदहिवडी चौकाजवळील विद्युत खांबावर पांडुरंग चढल्यानंतर त्याच्या हातात केबल देण्यात आली.
विद्युत तारेवर केबल जोडण्याचा प्रयत्न करताच अचानक मोठा स्पार्क झाला आणि त्याला जोरदार विद्युत धक्का बसला.
त्यामुळे तो खांबावरून खाली कोसळून गंभीर जखमी झाला. घटनेनंतर उपस्थित असलेले संबंधित दोघे घटनास्थळावरून निघून गेल्याचा आरोपही फिर्यादीत करण्यात आला आहे.
जखमी पांडुरंग यांना प्रथम सांगोला येथील दक्षता हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यानंतर प्रकृती गंभीर असल्याने
त्यांना मिरज येथील सेवासदन रुग्णालयात हलविण्यात आले. सुमारे सात दिवस उपचार सुरू असतानाच २६ मे २०२६ रोजी पहाटे त्यांचा मृत्यू झाला.
फिर्यादी रमाबाई माने यांनी दिलेल्या जबाबानुसार, पांडुरंग यांना विद्युत कामाचे कोणतेही अधिकृत प्रशिक्षण नव्हते.
तसेच त्यांना हातमोजे, प्लास्टिकचे बूट किंवा इतर कोणतीही सुरक्षा साधने देण्यात आली नव्हती.
अधिकृत परवानगी नसताना आणि वीजप्रवाह सुरू असल्याची जाणीव असतानाही त्यांना धोकादायक काम करण्यास लावण्यात आल्यामुळे हा मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या प्रकरणी गणेश बिभिषण येडगे व योगेश हनुमंत मोरे (रा. हलदहिवडी, ता. सांगोला) यांच्याविरुद्ध संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नागनाथ शिवाजी कदम करीत आहेत.
ग्रामीण भागात वाढत चाललेल्या बेकायदेशीर वीजजोडण्या, सुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन आणि निष्काळजीपणामुळे होणारे अपघात याबाबत पुन्हा
एकदा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून, अशा प्रकारांवर कठोर कारवाईची मागणी नागरिकांकडून होत आहे.


0 Comments