घेरडी ग्रामपंचायतीत 'कुलूपकांड'; शासकीय कामकाज ठप्प, तिघांविरुद्ध गुन्हा
सांगोला / प्रतिनिधी : सांगोला तालुक्यातील घेरडी ग्रामपंचायत कार्यालयात शासकीय कामकाजात अडथळा आणल्याची गंभीर घटना समोर आली आहे.
काही व्यक्तींनी ग्रामपंचायत कार्यालयात प्रवेश करून कर्मचाऱ्यांना बाहेर जाण्यास भाग पाडत कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराला कुलूप ठोकल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या प्रकारामुळे ग्रामपंचायतीचे दैनंदिन कामकाज पूर्णपणे विस्कळीत झाले असून नागरिकांची विविध शासकीय कामे दिवसभर ठप्प राहिली. या प्रकरणी सांगोला पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ग्रामसेवक बाबासाहेब यशवंत कोळी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, १ जुलै २०२६ रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास ग्रामपंचायत घेरडीचे लिपिक तुकाराम गळवे यांनी दूरध्वनीद्वारे कार्यालयात घडलेल्या प्रकाराची माहिती दिली.
त्यानुसार अनिल तानाजी मोटे, अमोल दत्तात्रय करे आणि बिरुदेव गंगाधर पुकळे (रा. घेरडी) यांनी ग्रामपंचायत कार्यालयात येऊन तेथील कर्मचारी बसवेश्वर रेवण लिंबे आणि बिरुदेव मारुती करडे यांना कार्यालयाबाहेर काढले.
यानंतर संबंधितांनी कार्यालयाच्या मुख्य दरवाजाला कुलूप लावल्याने शासकीय कामकाज ठप्प झाले. त्यामुळे दाखले, प्रमाणपत्रे, विविध शासकीय सेवा तसेच
नागरिकांची इतर आवश्यक कामे रखडली. शासकीय कर्मचाऱ्यांना त्यांचे कर्तव्य बजावण्यास अडथळा निर्माण झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
फिर्यादीत पुढे असेही म्हटले आहे की, कार्यालयाची चावी संबंधित व्यक्तींकडे असल्याने कार्यालयातील महत्त्वाची शासकीय कागदपत्रे,
अभिलेखे व इतर साहित्याच्या सुरक्षिततेबाबत चिंता निर्माण झाली आहे. अशा साहित्याचे नुकसान अथवा चोरी झाल्यास त्याची जबाबदारी संबंधितांवर राहील, असेही नमूद करण्यात आले आहे.
या घटनेनंतर सांगोला पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, या प्रकारामागील नेमके कारण काय, याचा तपास पोलीस करीत आहेत.
दरम्यान, घेरडी परिसरात या घटनेची जोरदार चर्चा सुरू असून, शासकीय कामकाजात अडथळा आणणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.


0 Comments