सांगोल्याचे माजी नगराध्यक्ष नवनाथ (भाऊ) पवार यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन; शहरावर शोककळा
सांगोला : सांगोला नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष तथा माजी नगरसेवक नवनाथ (भाऊ) पवार यांचे गुरुवार, दि. २ जुलै रोजी सायंकाळी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले.
निधनसमयी त्यांचे वय ६१ वर्षे होते. त्यांच्या आकस्मिक निधनामुळे सांगोला शहराच्या राजकीय, सामाजिक व सार्वजनिक क्षेत्रात शोककळा पसरली असून सर्व स्तरांतून हळहळ व्यक्त होत आहे.
नवनाथ (भाऊ) पवार यांनी नगरसेवक आणि नगराध्यक्ष म्हणून कार्य करताना नागरिकांच्या प्रश्नांना नेहमीच प्राधान्य दिले. नगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे सभापती म्हणून त्यांनी जबाबदारीने काम करत
शहराचा पाणीपुरवठा सुरळीत राहावा यासाठी सातत्याने प्रयत्न केले. त्यांच्या कार्यकाळात शिस्तबद्ध व पारदर्शक प्रशासनावर त्यांनी भर दिला होता.
राजकीय जबाबदाऱ्यांबरोबरच सामाजिक कार्यातही त्यांचा सक्रिय सहभाग होता. कोणत्याही अडचणीत असलेल्या नागरिकांच्या मदतीला तत्परतेने धावून जाणारे, शांत,
संयमी व मनमिळावू व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची ओळख होती. सर्वसामान्यांशी जिव्हाळ्याचे संबंध आणि सेवाभावी वृत्तीमुळे त्यांनी नागरिकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केले.
त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे. नवनाथ (भाऊ) पवार यांच्या निधनाने सांगोल्याने एक लोकाभिमुख, अभ्यासू आणि जनतेशी नाळ जपणारा लोकप्रतिनिधी गमावल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली आहे.


0 Comments