घेरडीत दुर्दैवी घटना; विवाहितेसह दोन चिमुकल्यांचा विहिरीत बुडून मृत्यू, पोलिसांकडून सर्व बाजूंनी तपास सुरू
सांगोला | प्रतिनिधी सांगोला तालुक्यातील घेरडी येथे एका विवाहित महिलेसह तिच्या दोन निष्पाप चिमुकल्यांचा विहिरीत बुडून मृत्यू झाल्याची अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे.
या घटनेमुळे संपूर्ण घेरडी गावावर शोककळा पसरली असून, परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून घटनेमागील नेमके कारण शोधण्यासाठी सर्व बाजूंनी तपास सुरू केला आहे.
मृतांमध्ये वैष्णवी आशिष यमगर (वय २८), तेजश्री आशिष यमगर (वय ३ वर्षे ६ महिने) आणि रुद्राक्ष आशिष यमगर (वय १५ महिने) यांचा समावेश आहे. तिघेही घेरडी (ता. सांगोला) येथील रहिवासी होते.
पोलीस माहितीनुसार, १ जुलै २०२६ रोजी सायंकाळच्या सुमारास आशिष महादेव यमगर यांच्या घरासमोरील शेतातील विहिरीत तिघांचे मृतदेह आढळून आले.
प्राथमिक नोंदीनुसार, घरगुती कारणातून ही घटना घडल्याचा संशय व्यक्त करण्यात आला असला, तरी त्याबाबत अद्याप कोणताही अंतिम निष्कर्ष काढण्यात आलेला नाही.
या घटनेची माहिती बाळू बाबुराव थोरबोले (रा. शिरनांदगी, ता. मंगळवेढा) यांनी सांगोला पोलिसांना दिली.
त्यानंतर सांगोला पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू रजिस्टर क्र. ११५/२०२६ अन्वये बी.एन.एस.एस. कलम १९४ अंतर्गत नोंद करण्यात आली.
आई आणि दोन लहान मुलांचा एकाच वेळी मृत्यू झाल्याने संपूर्ण गावात शोककळा पसरली असून, ग्रामस्थांकडून या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त करण्यात येत आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संजय ज्ञानेश्वर राऊत करीत आहेत.
शवविच्छेदन अहवाल, घटनास्थळावरील पुरावे आणि इतर बाबींची पडताळणी केल्यानंतरच घटनेमागील वस्तुस्थिती स्पष्ट होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.


0 Comments