खळबळजनक.. माळशिरस हादरलं! शेतात काम करणाऱ्या महिलेची भरदिवसा गोळ्या झाडून हत्या
माळशिरस (प्रतिनिधी) : सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यात मंगळवारी भरदिवसा घडलेल्या गोळीबाराच्या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
अकलूज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चौंडेश्वरवाडी येथे शेतात काम करत असलेल्या एका महिलेची अज्ञात कारणावरून गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.
या घटनेत उषा विजय साठे यांचा जागीच मृत्यू झाला. प्राथमिक माहितीनुसार, त्या शेतात काम करत असताना सचिन देशमुख नावाचा व्यक्ती तेथे आला आणि त्याने त्यांच्यावर गोळीबार केला. गंभीर जखमी झालेल्या उषा साठे यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच अकलूज पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. परिसराची पाहणी करून पुरावे संकलित करण्यात आले असून, आरोपीचा शोध आणि घटनेमागील नेमके कारण शोधण्यासाठी तपासाची चक्रे वेगाने फिरू लागली आहेत.
गोळीबारामागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून, वैयक्तिक वाद, जुने मतभेद किंवा अन्य कोणते कारण आहे का, याचा सर्व बाजूंनी तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
दिवसाढवळ्या शेतात घडलेल्या या हत्याकांडामुळे चौंडेश्वरवाडीसह संपूर्ण माळशिरस तालुक्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, नागरिकांकडून आरोपीविरुद्ध कठोर कारवाईची मागणी केली जात आहे.


0 Comments