घरी बीएलओ आल्यावर दुर्लक्ष करू नका! तीन भेटीनंतरही संपर्क न झाल्यास मतदार यादीतून नाव वगळले जाऊ शकते
सांगोला/प्रतिनिधी : मतदार यादी अधिक अचूक व पारदर्शक करण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने विशेष पुनर्निरीक्षण मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेदरम्यान प्रत्येक मतदाराच्या घरी बूथ लेव्हल
अधिकारी (बीएलओ) भेट देऊन माहितीची पडताळणी करणार आहेत. नागरिकांनी या प्रक्रियेला सहकार्य न केल्यास त्यांचे नाव मतदार यादीतून वगळले जाण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
या मोहिमेअंतर्गत मतदार यादीतील डुप्लिकेट, मयत, स्थलांतरित तसेच अपात्र नावे वगळून नव्याने पात्र ठरणाऱ्या नागरिकांची नावे समाविष्ट केली जाणार आहेत.
यासाठी बीएलओ प्रत्येक घराला तीन वेळा भेट देणार असून आवश्यक माहिती व फॉर्म भरून घेणार आहेत.
जर बीएलओच्या तिन्ही भेटीदरम्यान संबंधित मतदार घरी उपस्थित नसेल किंवा फॉर्म भरून दिला गेला नाही, तर बीएलओ घरावर नोटीस लावेल. त्यानंतरही संपर्क न झाल्यास संबंधित नावाबाबत पुढील कार्यवाही होऊ शकते.
सोलापूर जिल्ह्यात ही मोहीम ३९ लाख ३८ हजार ६३१ मतदारांसाठी राबविण्यात येणार असून, त्यासाठी ३ हजार ७२३ बीएलओ नियुक्त करण्यात आले आहेत.
जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी सर्व बीएलओंना प्रत्येक मतदाराच्या घरी प्रत्यक्ष भेट देण्याच्या सूचना दिल्या आहेत.
जन्मतारखेनुसार आवश्यक कागदपत्रे
१ जुलै १९८७ पूर्वी जन्म झालेल्या आणि २००२ च्या मतदार यादीत नाव असलेल्या मतदारांना केवळ मॅपिंग फॉर्म भरावा लागेल.
१ जुलै १९८७ पूर्वी जन्म झाला असून मतदार यादीत नाव नसेल, तर जन्मतारीख व जन्मस्थळाचा पुरावा आवश्यक आहे.
१ जुलै १९८७ ते २ डिसेंबर २००४ दरम्यान जन्म झालेल्यांनी स्वतःचा तसेच आई किंवा वडिलांपैकी एकाचा जन्माचा पुरावा सादर करावा.
२ डिसेंबर २००४ नंतर जन्म झालेल्यांनी स्वतःचा तसेच आई-वडील दोघांच्याही जन्माचा पुरावा द्यावा.
स्वीकारण्यात येणारी प्रमुख कागदपत्रे
जन्मदाखला, पासपोर्ट, जात प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र, दहावी-बारावीचे प्रमाणपत्र, कुटुंब नोंदवही, सरकारी जमीन किंवा घराची कागदपत्रे,
सरकारी ओळखपत्र, पेन्शन आदेश, वनहक्क प्रमाणपत्र तसेच १ जुलै १९८७ पूर्वीचे बँक किंवा पोस्टाचे पासबुक यांचा पुरावा म्हणून उपयोग करता येणार आहे.
महत्त्वाचे वेळापत्रक
३० जून ते २९ जुलै : बीएलओमार्फत घरोघरी माहिती संकलन
५ ऑगस्ट : प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध
५ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर : दावा व हरकती नोंदविण्याची मुदत
७ ऑक्टोबर : अंतिम मतदार यादी प्रसिद्ध
निवडणूक आयोगाने नागरिकांना बीएलओ घरी आल्यास आवश्यक कागदपत्रांसह माहिती देऊन सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे, जेणेकरून मतदार यादीत आपले नाव कायम राहील आणि मतदानाचा अधिकार अबाधित राहील.


0 Comments