Breaking News

सांगोल्यात प्रतिबंधित पानमसाला-तंबाखूचा साठा जप्त; ४१ हजार ५४६ रुपयांचा मुद्देमाल सील, तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल

सांगोल्यात प्रतिबंधित पानमसाला-तंबाखूचा साठा जप्त; ४१ हजार ५४६ रुपयांचा मुद्देमाल सील, तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल


सांगोला | प्रतिनिधी सांगोला शहरातील चिंचोला रोड परिसरात अन्न व औषध प्रशासन आणि पोलिसांनी संयुक्त कारवाई करत प्रतिबंधित पानमसाला व तंबाखूजन्य पदार्थांचा मोठा साठा जप्त केला. 

या कारवाईत एकूण ₹४१,५४६ किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून संबंधित गाळे पुढील आदेशापर्यंत सीलबंद करण्यात आले आहेत.

अन्न सुरक्षा अधिकारी गणेश महादेव कदम यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, सोमनाथ अमर बुधवंतराव (वय २०, रा. चिंचोला रोड, सांगोला) याच्या ताब्यातील गाळ्यांची तपासणी करण्यात आली. 

तपासणीदरम्यान रजनीगंधा, कॉकटेल, डायरेक्टर स्पेशल, आरएमडी, एम सेंटेड तंबाखू, सीसी-१० अल्फा टोबॅको, प्रीमियम सुपर जेम, प्रीमियम शॉट तंबाखू, तुलसी ०० रॉयल जाफरानी जर्दा यांसह विविध प्रतिबंधित अन्नपदार्थांचा साठा आढळून आला.

पंचांसमक्ष पंचनामा करून सर्व मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच प्रयोगशाळा तपासणीसाठी नमुने स्वतंत्रपणे घेण्यात आले असून उर्वरित साठा पुन्हा विक्रीसाठी वापरला जाऊ नये म्हणून दोन्ही गाळे सीलबंद करण्यात आले आहेत.

चौकशीदरम्यान संबंधित व्यक्तीकडे या प्रतिबंधित मालाचा मूळ पुरवठादार किंवा खरेदीबाबत समाधानकारक माहिती उपलब्ध झाली नसल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

 त्यामुळे या साठ्याचा मूळ मालक, पुरवठादार आणि गाळ्यांचे प्रत्यक्ष मालक यांचा शोध घेण्यासाठी पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.

या प्रकरणी अन्न सुरक्षा व मानके कायदा, २००६ मधील विविध कलमांसह भारतीय न्याय संहितेच्या कलम २२३, २७४, २७५ व १२३ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

Post a Comment

0 Comments