सांगोल्याच्या शाळेची राष्ट्रीय कामगिरी; पंतप्रधानांच्या हस्ते होणार गौरव
सोलापूर, 13 जुलै (हिं.स.)केंद्र सरकारच्या शिक्षण मंत्रालयातर्फे आयोजित 'स्वच्छ आणि हरित विद्यालय मानांकन' स्पर्धेत सांगोला तालुक्यातील शेळकेवाडी (शिवणे)
येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेने राष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
शाळेला ९०.८० गुणांसह 'फाईव्ह स्टार' मानांकन मिळाले असून देशातील सर्वोत्तम १९१ शाळांमध्ये ६३वा क्रमांक प्राप्त झाला आहे.
विशेष म्हणजे, हा बहुमान मिळवणारी महाराष्ट्रातील एकमेव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ठरली आहे.
या उल्लेखनीय कामगिरीबद्दल आगामी काही दिवसांत नवी दिल्ली येथे पंतप्रधानांच्या हस्ते शाळेला रोख पारितोषिक आणि सन्मानचिन्ह प्रदान करून गौरविण्यात येणार आहे.
केंद्र सरकारच्या शिक्षण मंत्रालयाच्या शालेय शिक्षण व साक्षरता विभागाने अत्यंत कडक निकषांच्या आधारे हे मूल्यांकन केले.
शाळांकडून ६० प्रश्नांवर आधारित स्वयंमूल्यांकन मागविण्यात आले होते. त्यानंतर जल व्यवस्थापन, स्वच्छता व आरोग्य सुविधा,
कचरा व्यवस्थापन, ऊर्जा संवर्धन, हरित परिसर आणि विद्यार्थी सहभाग या सहा प्रमुख निकषांवर अंतिम मूल्यमापन करण्यात आले.
शेळकेवाडी जिल्हा परिषद शाळेने शुद्ध पिण्याच्या पाण्याची सुविधा, रेन वॉटर हार्वेस्टिंग, स्वच्छ व स्वतंत्र स्वच्छतागृहे, प्लास्टिकमुक्त परिसर, कंपोस्ट खत निर्मिती,
सौरऊर्जेचा वापर, वृक्षसंवर्धन, परसबाग तसेच इको क्लब आणि पर्यावरण क्लबच्या माध्यमातून विविध जनजागृती उपक्रम प्रभावीपणे राबविले.
या सर्व उपक्रमांची दखल घेत शाळेला राष्ट्रीय स्तरावरील 'फाईव्ह स्टार' मानांकन बहाल करण्यात आले आहे.
या यशामुळे सांगोला तालुक्यासह सोलापूर जिल्ह्याच्या शैक्षणिक क्षेत्राचा गौरव वाढला असून, ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळांसाठी शेळकेवाडी शाळेने एक प्रेरणादायी आदर्श निर्माण केला आहे.


0 Comments