Breaking News

सोलापूर जिल्ह्यातील सर्वात मोठी धडक कारवाई; सांगोला-अकलूज मार्गावर सव्वा कोटींची बनावट विदेशी दारू जप्त

सोलापूर जिल्ह्यातील सर्वात मोठी धडक कारवाई; सांगोला-अकलूज मार्गावर सव्वा कोटींची बनावट विदेशी दारू जप्त


सांगोला | प्रतिनिधी आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने मोठी धडक कारवाई करत सांगोला-अकलूज मार्गावरील साळमुख परिसरात बनावट विदेशी दारूने भरलेला ट्रक जप्त केला. 

या कारवाईत सुमारे ७०० बॉक्स बनावट व्हिस्की, ट्रकसह अंदाजे सव्वा कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. ही कारवाई सोलापूर जिल्ह्यातील राज्य उत्पादन शुल्क विभागाची आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गोवा येथून बनावट विदेशी दारूचा मोठा साठा धुळे जिल्ह्याकडे नेला जात असल्याची गुप्त माहिती अकलूज येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाली होती. त्यानुसार अधिकाऱ्यांनी विशेष पथक तयार करून सांगोला-अकलूज मार्गावर सापळा रचला.

साळमुख परिसरात संशयित ट्रक अडवून तपासणी केली असता त्यामध्ये गोव्यात तयार करण्यात आलेल्या बनावट व्हिस्कीचे तब्बल ७०० बॉक्स आढळून आले. प्राथमिक चौकशीत ही दारू धुळे येथे पोहोचविण्यात येणार असल्याचे समोर आले आहे.

कारवाईदरम्यान ट्रकचालकासह दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून त्यापैकी एक जण धुळे जिल्ह्यातील असल्याची माहिती मिळाली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून सुरू आहे. 

बनावट दारूचे जाळे, त्यामागील सूत्रधार आणि वितरण साखळीचा शोध घेण्याचे काम सुरू असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

आषाढी यात्रेदरम्यान अवैध मद्यविक्री आणि वाहतूक रोखण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने जिल्हाभर विशेष नाकेबंदी आणि तपासणी मोहीम हाती घेतली आहे.

 या मोहिमेअंतर्गत झालेली ही कारवाई अत्यंत महत्त्वाची मानली जात असून राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक भाग्यश्री जाधव यांनी ही सोलापूर जिल्ह्यातील सर्वात मोठी कारवाई असल्याचे सांगितले.

Post a Comment

0 Comments