सांगोल्याच्या पाणीप्रश्नाला वेग; पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिले तातडीच्या कार्यवाहीचे आदेश माजी आमदार दिपकआबा साळुंखे-पाटील
दुष्काळी तालुक्यासाठी पुराचे अतिरिक्त पाणी सोडण्याच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद; माजी आमदार दिपकआबा साळुंखे-पाटील यांच्या पाठपुराव्याला यश
सांगोला | प्रतिनिधी राज्यातील अनेक नद्या महापुराने दुथडी भरून वाहत असताना दुष्काळी सांगोला तालुका मात्र पाण्याअभावी होरपळत आहे. ही गंभीर परिस्थिती लक्षात घेऊन राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा
सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक डॉ. हनुमंत धुमाळ यांना सांगोला तालुक्यासाठी पुराचे अतिरिक्त पाणी तातडीने सोडण्याचे निर्देश दिले आहेत.
सांगोला तालुक्यातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी माजी आमदार दिपकआबा साळुंखे-पाटील सातत्याने पाठपुरावा करत असून, मंगळवारी (२८ जुलै) त्यांनी मुंबई येथील
पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या शासकीय निवासस्थानी भेट घेऊन निवेदन सादर केले. या निवेदनाची तातडीने दखल घेत पालकमंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक कार्यवाही करण्याचे आदेश दिले.
यंदा निम्म्याहून अधिक पावसाळा उलटूनही सांगोला तालुक्यात समाधानकारक पाऊस झालेला नाही. त्यामुळे खरीप हंगाम अक्षरशः वाया गेला असून शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.
दुसरीकडे जनावरांसाठी हिरव्या चाऱ्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. पिण्याच्या पाण्याचे स्रोतही आटत चालल्याने नागरिकांसह पशुपालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
या पार्श्वभूमीवर टेंभू उपसा सिंचन योजनेतून मानगंगा नदी व लाभक्षेत्रातील तलावांमध्ये, म्हैसाळ उपसा सिंचन योजनेतून कोरडा नदी व संबंधित तलावांमध्ये तसेच
नीरा उजवा कालव्यातून लाभक्षेत्रात पुराचे अतिरिक्त पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
या निर्णयामुळे सांगोला तालुक्यातील शेतकरी, पशुपालक आणि लाखो पशुधनाला मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
चौकट : पाणीप्रश्नावर दिपकआबांचा सातत्यपूर्ण लढा
सांगोला तालुक्याच्या पाणीप्रश्नासाठी माजी आमदार दिपकआबा साळुंखे-पाटील यांनी विविध स्तरांवर सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला आहे.
जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना लेखी निवेदन देण्यापासून ते सांगोला तहसील कार्यालयावर निवेदन सादर करण्यापर्यंत त्यांनी प्रयत्न केले. त्यानंतर पालकमंत्री जयकुमार गोरे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन
दुष्काळी परिस्थितीची माहिती दिली. या पाठपुराव्यामुळे सांगोला तालुक्याला पुराचे अतिरिक्त पाणी मिळण्याची प्रक्रिया वेगाने पुढे सरकण्याची आशा निर्माण झाली आहे.


0 Comments