Breaking News

वार्ड क्रमांक ४ मध्ये रस्त्यावर मुरूम टाकल्याने नागरिकांमध्ये संताप; १५ ऑगस्टला आंदोलनाचा इशारा

वार्ड क्रमांक ४ मध्ये रस्त्यावर मुरूम टाकल्याने नागरिकांमध्ये संताप; १५ ऑगस्टला आंदोलनाचा इशारा


सांगोला | प्रतिनिधी सांगोला शहरातील वार्ड क्रमांक ४ मध्ये भुयारी गटार योजनेचे काम पूर्ण झाल्यानंतर रस्त्यावर करण्यात आलेल्या कामावरून स्थानिक नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. 

नागरिकांच्या म्हणण्यानुसार, चांगल्या स्थितीतील सिमेंट काँक्रीट रस्त्यावर अनावश्यकपणे मुरूम टाकण्यात आल्याने वाहतुकीस अडथळे निर्माण झाले असून नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

स्थानिक नागरिकांनी सांगितले की, भुयारी गटार योजनेसाठी रस्त्याच्या मध्यभागी खोदकाम करण्यात आले होते. काम पूर्ण झाल्यानंतर संबंधित भाग बुजविण्यात आला होता. त्यामुळे रस्त्याचा फक्त मध्यभाग प्रभावित झाला होता, 

तर दोन्ही बाजूंचा सिमेंट काँक्रीट रस्ता चांगल्या स्थितीत होता. नागरिकांनी स्वतः पुढाकार घेऊन रस्त्यावर साचलेली माती व दगड हटवून रस्ता स्वच्छ केला होता.

मात्र, कोणतीही पूर्वसूचना न देता किंवा स्थानिकांना विश्वासात न घेता संपूर्ण रस्त्यावर मुरूम टाकण्यात आल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. त्यामुळे दुचाकीस्वार, वाहनचालक तसेच पादचाऱ्यांना ये-जा करताना अडचणी निर्माण होत असल्याचे त्यांनी सांगितले.

वार्डातील नागरिकांनी आरोप केला आहे की, स्थानिकांच्या अडीअडचणी व मूलभूत गरजांकडे दुर्लक्ष करून काही निर्णय एकतर्फी घेतले जात आहेत. नागरिकांशी कोणतीही चर्चा न करता मनमानी पद्धतीने कारभार होत असल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली.

या प्रकरणाची नगरपरिषद प्रशासनाने तातडीने दखल घेऊन संबंधित कामाची चौकशी करावी, रस्ता पूर्ववत करावा आणि नागरिकांना दिलासा द्यावा, 

अशी मागणी करण्यात आली आहे. मागणीकडे दुर्लक्ष झाल्यास १५ ऑगस्ट रोजी सांगोला नगरपरिषद कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येईल, असा इशारा स्थानिक नागरिकांनी दिला आहे.

Post a Comment

0 Comments