सांगोला तालुक्यातील रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करा; (श.प.राष्ट्रवादी काँग्रेसच्या सामाजिक न्याय विभागाचे परमेश्वर गेजगे तहसीलदारांना निवेदन
सांगोला | प्रतिनिधी सांगोला शहरासह तालुक्यातील विविध गावांना जोडणाऱ्या प्रमुख रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून, नागरिक, विद्यार्थी व वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) सामाजिक न्याय विभागाचे सांगोला सरचिटणीस परमेश्वर पांडुरंग गेजगे यांनी तहसीलदार, सांगोला यांना निवेदन देऊन रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, तालुक्यातील अनेक रस्ते खड्डेमय झाले असून, वाहनचालकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे लहान
-मोठे अपघात वाढले असून, नागरिकांसह शालेय विद्यार्थी आणि महिला यांनाही मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
तसेच रस्त्यांच्या कडेला मोठ्या प्रमाणात वाढलेली झाडे-झुडपे व चिलारी यामुळे वाहनांच्या अपघातांचे प्रमाण वाढत असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.
विशेषतः कडलास, जवळा, घेरडी तसेच सांगोला तालुक्यातील सर्व प्रमुख रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करून नागरिकांना सुरक्षित प्रवासाची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
यावेळी संबंधित प्रशासनाने तातडीने दखल घेऊन आवश्यक उपाययोजना कराव्यात, अन्यथा नागरिकांच्या वतीने पुढील तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात येण्याची शक्यता व्यक्त होत आहे.


0 Comments