Breaking News

जवळ्यात भेसळयुक्त दुधाचा मोठा भांडाफोड; ३७ हजार लिटर दूध जप्त, १५ लाखांचा साठा नष्ट अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई; परवाना, नोंदी व गुणवत्तेतील गंभीर त्रुटी उघड

जवळ्यात भेसळयुक्त दुधाचा मोठा भांडाफोड; ३७ हजार लिटर दूध जप्त, १५ लाखांचा साठा नष्ट अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई; परवाना, नोंदी व गुणवत्तेतील गंभीर त्रुटी उघड


सांगोला | प्रतिनिधी सांगोला तालुक्यातील जवळा येथे भेसळयुक्त दुधाच्या व्यवसायावर अन्न व औषध प्रशासनाने मोठी कारवाई करत तब्बल ३७ हजार ५३२ लिटर संशयित भेसळयुक्त दूध जप्त करून त्याची विल्हेवाट लावली. 

या दुधाची अंदाजे किंमत १५ लाख रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे. या कारवाईमुळे तालुक्यात खळबळ उडाली असून, दुधाच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

शनिवार (दि. ११ जुलै) रोजी जवळा येथील बुरंगेवाडी परिसरातील अजिंक्यराणा दूध संकलन केंद्रावर अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने अचानक छापा टाकला. 

प्राथमिक तपासणीत दुधाच्या गुणवत्तेबाबत संशय निर्माण झाल्याने नमुने तपासण्यात आले. त्यामध्ये दुधातील SNF (Solid-Not-Fat) चे प्रमाण विहित मर्यादेपेक्षा कमी असल्याचे निदर्शनास आले.

तपासादरम्यान संबंधित केंद्राकडे दूध संकलन व चिलिंग युनिटचा वैध परवाना नसल्याचेही आढळून आले. तसेच दूध खरेदी-विक्रीची आवश्यक नोंद व्यवस्थित

 ठेवण्यात आलेली नसल्याचे आणि अन्नसुरक्षा नियमांचे अनेक प्रकारे उल्लंघन झाल्याचे अधिकाऱ्यांनी नमूद केले.

या कारवाईदरम्यान मोठ्या प्रमाणातील दूध जप्त करून त्याची विल्हेवाट लावण्यात आली. अन्न व औषध प्रशासनाचे अन्नसुरक्षा आयुक्त साहेबराव देसाई, 

अन्नसुरक्षा अधिकारी गणेश कदम आणि मंगेश लवटे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली.

दरम्यान, परिसरात काही व्यक्तींकडून हा व्यवसाय चालविला जात असल्याची चर्चा असली तरी अधिकृत तपास पूर्ण होईपर्यंत

 संबंधितांविषयी प्रशासनाकडून कोणतीही अंतिम भूमिका जाहीर करण्यात आलेली नाही. त्यामुळे तपासाच्या निष्कर्षानंतरच पुढील कायदेशीर कारवाई स्पष्ट होणार आहे.

या धडक कारवाईमुळे तालुक्यातील नागरिकांनी अन्न व औषध प्रशासनाच्या कारवाईचे स्वागत केले असून, अन्नभेसळ करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.

चौकट : भेसळखोरांविरोधात कठोर कारवाईची मागणी

दूध हा लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वांच्या दैनंदिन आहारातील अत्यावश्यक घटक आहे. अशा अन्नपदार्थात भेसळ करून नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांविरोधात कठोरात कठोर कायदेशीर कारवाई व्हावी,

 अशी मागणी नागरिकांकडून व्यक्त होत आहे. तपासात दोषी आढळणाऱ्यांवर कठोर गुन्हे दाखल करून भविष्यात अशा प्रकारांना आळा घालावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Post a Comment

0 Comments