सांगोल्यात दुचाकीच्या डिकीतून ८० हजारांची रोकड लंपास; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा
सांगोला : सांगोला शहरातील शिवाजी चौक परिसरात दुचाकीच्या डिकीत ठेवलेली ८० हजार रुपयांची रोकड अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना
७ जुलै रोजी सायंकाळी घडली. या प्रकरणी सांगोला पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बागलवाडी (ता. सांगोला) येथील शेतकरी सिद्धेश्वर दत्तू चव्हाण (वय ६५) यांनी शेतीच्या कामासाठी,
मजुरांचे पगार तसेच ट्रॅक्टर नांगरणीचा खर्च भागविण्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडिया, वाढेगाव नाका शाखेतून ७ जुलै रोजी सायंकाळी सुमारे ४ वाजता आपल्या खात्यातून ८० हजार रुपये काढले.
ही रक्कम त्यांनी पांढऱ्या रंगाच्या कॅरीबॅगमध्ये ठेवून आपल्या एचएफ डिलक्स (एमएच-४५ ओ-३०४४) दुचाकीच्या डिकीत ठेवली.
त्यानंतर ते शिवाजी चौक परिसरात बनियन शिवून घेण्यासाठी एका टेलरकडे गेले. काम पूर्ण झाल्यानंतर बनियन डिकीत ठेवण्यासाठी गेले
असता डिकी उघडी असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. डिकीत ठेवलेली रोकड असलेली कॅरीबॅग गायब झाल्याचे दिसून आले.
त्यांनी परिसरात तसेच बँकेपासून ये-जा केलेल्या मार्गावर शोध घेतला, मात्र रक्कम मिळून आली नाही.
यामुळे अज्ञात चोरट्याने डिकी उघडून ८० हजार रुपयांची रोकड चोरून नेल्याची खात्री झाल्याने त्यांनी सांगोला पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.


0 Comments