सांगोल्याच्या पाणीप्रश्नाला मोठा दिलासा; नीरा-देवधर कालव्यातून १ टीएमसी पाण्याच्या कामाला वेग माजी आमदार शहाजी बापू पाटील
मंत्रालयात जलसंपदा मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक; सर्वेक्षण, निविदा आणि अंमलबजावणीला गती देण्याचे निर्देश
सांगोला | प्रतिनिधी सांगोला तालुक्याच्या दीर्घकालीन पाणीटंचाईवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल पडले असून, नीरा-देवधर कालवा योजनेतून सांगोला मतदारसंघासाठी १ टीएमसी पाणी उपलब्ध करून
देण्याच्या निर्णयाच्या अंमलबजावणीला आता गती मिळणार आहे. यासंदर्भात मंत्रालयात जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली.
यापूर्वी राज्य मंत्रिमंडळाने सांगोल्यासाठी १ टीएमसी पाणी देण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली होती. आता या निर्णयाची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यासाठी आवश्यक
सर्वेक्षण, निविदा प्रक्रिया आणि पुढील प्रशासकीय कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश संबंधित विभागांना देण्यात आले.
बैठकीत पुरग्रस्त भागातील अतिरिक्त पाण्याचा प्रभावी वापर करून टेंभू व म्हैसाळ सिंचन योजनांना बळकटी देणे, तसेच सांगोला तालुक्यासाठी नीरा-देवधर कालव्यातून पाणी उपलब्ध करून
देण्याबाबत सविस्तर चर्चा झाली. जलसंपदा विभागातील अधिकाऱ्यांना नियोजनबद्ध आणि वेळेत काम पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
या बैठकीस खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, आमदार शहाजीबापू पाटील, आमदार नारायण आबा पाटील यांच्यासह संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
सांगोला तालुक्यातील शेतकरी, नागरिक आणि भावी पिढ्यांच्या पाणीहक्कासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना या बैठकीमुळे नवे बळ मिळाल्याची भावना व्यक्त होत आहे. प्रस्तावित योजना पूर्णत्वास गेल्यास दुष्काळी सांगोल्याच्या विकासाला नवी दिशा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
चौकट :
शेतकऱ्यांसाठी दिलासादायक निर्णय
नीरा-देवधर कालव्यातून १ टीएमसी पाणी उपलब्ध झाल्यास सांगोला तालुक्यातील सिंचन क्षेत्रात वाढ होण्यास मदत होईल. शेती, पिण्याचे पाणी आणि
ग्रामीण विकासाच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वाचा मानला जात असून, अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या पाणीप्रश्नाच्या निराकरणासाठी हा टप्पा निर्णायक ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


0 Comments