हातीद उपविभागातील वारंवार वीज खंडित होण्याविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार; आमदार दीपक आबा साळुंखे-पाटील यांच्या हस्तक्षेपाने प्रशासनाला सूचना
सांगोला : कोळा, जुनोनी, जुजारपूर, हातीद, हटकर मंगेवाडी, तीप्पेहळी तसेच हातीद वीज उपविभागांतर्गत येणाऱ्या गावांमध्ये वारंवार होणाऱ्या वीज खंडित होण्याच्या समस्येमुळे शेतकरी,
विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील नागरिक मोठ्या अडचणीत सापडले आहेत. विशेषतः सकाळी ६ ते ९ आणि सायंकाळी ६ ते १० या वेळेत होणारे फोर्स लोडशेडिंग नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत असल्याची भावना व्यक्त करण्यात आली.
या पार्श्वभूमीवर कार्यसम्राट आमदार दीपक आबा साळुंखे-पाटील यांच्या गटाच्या वतीने हातीद विद्युत उपविभागीय कार्यालयात उपअभियंता माने व शाखा
अभियंता दिघे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी परिसरातील शेतकरी व पदाधिकाऱ्यांनी वीजपुरवठा नियमित करण्याची मागणी केली.
निवेदनानंतर आमदार दीपक आबा साळुंखे-पाटील यांनी उपअभियंता माने, शाखा अभियंता दिघे तसेच शेतकरी प्रतिनिधींशी दूरध्वनीवरून चर्चा केली.
ग्रामीण भागातील नागरिक, विद्यार्थी आणि शेतकऱ्यांची गैरसोय लक्षात घेऊन शक्य तितक्या लवकर वीजपुरवठ्यात सुधारणा करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
आमदारांच्या हस्तक्षेपामुळे वीजपुरवठ्याचा प्रश्न लवकर मार्गी लागेल आणि शेतकरी व विद्यार्थ्यांना दिलासा मिळेल, अशी अपेक्षा परिसरातील नागरिकांनी व्यक्त केली.


0 Comments