Breaking News

दूध भेसळ प्रकरणातील कारवाईवर संशयाचे सावट; अनुत्तरित प्रश्नांमुळे स्वतंत्र चौकशीची मागणी तीव्र

दूध भेसळ प्रकरणातील कारवाईवर संशयाचे सावट; अनुत्तरित प्रश्नांमुळे स्वतंत्र चौकशीची मागणी तीव्र


सांगोला प्रतिनिधी : दूध भेसळ प्रकरणात करण्यात आलेल्या कारवाईबाबत अनेक गंभीर प्रश्न उपस्थित होत असून, अधिकृत माहितीच्या अभावामुळे नागरिकांमध्ये संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे. 

संबंधित कारवाई पारदर्शक पद्धतीने झाली का, याबाबत विविध स्तरांतून शंका व्यक्त केल्या जात असून संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष आणि उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

नागरिकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांमध्ये धाडीदरम्यान जप्त करण्यात आलेल्या ३७ हजार ५३२ लिटर दुधाचे प्रत्यक्षात पूर्णपणे नष्टिकरण झाले का, यासह घटनास्थळी आढळल्याचा दावा करण्यात आलेली

 रसायने अधिकृतरीत्या जप्त करण्यात आली होती का, असे मुद्दे आहेत. तसेच युरिया आणि कॉस्टिक सोडाच्या जाळण्यात आलेल्या पोत्यांचा पंचनाम्यात स्पष्ट उल्लेख आहे का, याचाही खुलासा करण्याची मागणी होत आहे.

याशिवाय, दुधाने भरलेले टँकर घटनास्थळावरून बाहेर का जाऊ देण्यात आले, संबंधित दूध संकलन केंद्र व जबाबदार व्यक्तींवर तत्काळ गुन्हा दाखल करण्यात आला

 का, तसेच पंचनामा, नमुना तपासणी अहवाल, सीसीटीव्ही फुटेज आणि दूध नष्ट केल्याची अधिकृत नोंद सार्वजनिक का करण्यात आली नाही, असे प्रश्नही उपस्थित केले जात आहेत.

कारवाईदरम्यान उपस्थित अधिकाऱ्यांनी कोणती भूमिका बजावली आणि संपूर्ण प्रक्रिया नियमानुसार पार पडली का, याबाबतही नागरिकांकडून स्पष्टीकरणाची मागणी होत आहे. 

या सर्व प्रश्नांची अधिकृत व स्पष्ट उत्तरे मिळाल्याशिवाय कारवाईबाबत निर्माण झालेला संशय दूर होणार नाही, असे मत व्यक्त केले जात आहे.

भेसळयुक्त अन्नपदार्थांचा विषय थेट जनतेच्या आरोग्याशी संबंधित असल्याने संपूर्ण कारवाईतील प्रत्येक बाब पारदर्शकपणे जनतेसमोर यावी, अशी मागणी वाढत आहे. धाडीदरम्यानचे सीसीटीव्ही फुटेज, 

पंचनामा, नमुना तपासणी अहवाल, दूध नष्ट केल्याची अधिकृत नोंद, टँकर वाहतुकीची माहिती आणि घटनास्थळाचे व्हिडिओ रेकॉर्डिंग सार्वजनिक करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

स्थानिकांच्या मते, या प्रकरणातील काही बाबींकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष झाले का, याची स्वतंत्र चौकशी होणे आवश्यक आहे. 

त्यामुळे संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय आणि निष्पक्ष चौकशी करून सत्य जनतेसमोर आणावे, अशी मागणी आता अधिक तीव्र होत आहे.

दरम्यान, राज्यात भेसळविरोधी मोहिमेला गती देणारे अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी या प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करून वस्तुस्थिती स्पष्ट करावी,

 तसेच चौकशीत कोणत्याही अधिकारी किंवा संबंधित व्यक्तीची भूमिका संशयास्पद आढळल्यास त्यांच्यावर कायद्यानुसार कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे

Post a Comment

0 Comments