Breaking News

"सिजेंन्टा कंपनीच्या 'इंद्रा' सिमला मिरची रोपांमुळे शेतकऱ्यांचा कोट्यवधींचा फटका? सांगोल्यात कृषी अधिकाऱ्यांकडे सामूहिक तक्रार"

"सिजेंन्टा कंपनीच्या 'इंद्रा' सिमला मिरची रोपांमुळे शेतकऱ्यांचा कोट्यवधींचा फटका? सांगोल्यात कृषी अधिकाऱ्यांकडे सामूहिक तक्रार"


सांगोला | प्रतिनिधी सांगोला तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी सिजेंन्टा कंपनीच्या 'इंद्रा' सिमला मिरचीच्या रोपांमुळे मोठे आर्थिक नुकसान झाल्याचा आरोप करत तालुका कृषी अधिकारी, सांगोला यांच्याकडे सामूहिक तक्रार दाखल केली आहे. 

संबंधित रोपवाटिका चालक आणि कंपनीच्या प्रतिनिधींवर फसवणूक केल्याचा आरोप करत कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे.

तक्रारीनुसार, शेतकऱ्यांनी भोसेफाटा (ता. मिरज) येथील बापू लक्ष्मण वाघमोडे हायटेक रोपवाटिका तसेच नरूटेवाडी येथील सिद्धनाथ हायटेक

 नर्सरी येथून सिजेंन्टा कंपनीच्या 'इंद्रा' जातीची सिमला मिरचीची रोपे मे २०२६ मध्ये प्रती रोप तीन रुपयांप्रमाणे खरेदी केली होती.

 कंपनीचे प्रतिनिधी आणि रोपवाटिका चालकांनी ४५ दिवसांत पहिला तोडा सुरू होईल तसेच प्रति एकर ५० ते ६० टन उत्पादन मिळेल, अशी हमी दिल्याचा दावा शेतकऱ्यांनी केला आहे.

मात्र, ५० ते ७० दिवस उलटूनही अपेक्षित उत्पादन आले नाही. काही मिरच्या लागल्या तरी त्या आकाराने अतिशय लहान असल्याने बाजारात विक्रीयोग्य नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. 

त्यामुळे प्रति एकर सुमारे चार ते साडेचार लाख रुपयांचा खर्च वाया गेला, तर अपेक्षित उत्पन्नही हुकल्याचा दावा करण्यात आला आहे.

शेतकऱ्यांनी याबाबत कंपनीचे प्रतिनिधी विशाल पाटील, विनोद उगले, नवनाथ खरात तसेच संबंधित रोपवाटिका चालकांकडे तक्रार केली होती.

 त्यांनी शेतात भेट देऊन पाहणी केली व नुकसानभरपाईचे आश्वासन दिले. मात्र, त्यानंतर कोणताही संपर्क झाला नसल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

दुष्काळी परिस्थितीत टँकरद्वारे पाणी आणून रोपे जिवंत ठेवण्यासाठी मोठा खर्च करावा लागल्याने नुकसान अधिक वाढल्याचे शेतकऱ्यांनी नमूद केले आहे. 

त्यामुळे संबंधित रोपवाटिका चालक व सिजेंन्टा कंपनीच्या प्रतिनिधींवर कठोर कारवाई करून नुकसानभरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी कृषी विभागाकडे करण्यात आली आहे.

Post a Comment

0 Comments