Breaking News

घेरडीतील मॉडर्न हायस्कूलच्या शिपाई भरतीवर संशयाचे सावट ‘शिक्षण घेत असतानाच नोकरीची मान्यता’; चौकशी करून कारवाईची मागणी

घेरडीतील मॉडर्न हायस्कूलच्या शिपाई भरतीवर संशयाचे सावट


‘शिक्षण घेत असतानाच नोकरीची मान्यता’; चौकशी करून कारवाईची मागणी

सांगोला, प्रतिनिधी : सांगोला तालुक्यातील घेरडी येथील मॉडर्न हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयातील दोन शिपाई पदांच्या नियुक्त्यांबाबत गंभीर अनियमिततेचे आरोप समोर आले

 असून या नियुक्त्यांना देण्यात आलेली मान्यता तत्काळ रद्द करून संबंधितांवर फौजदारी कारवाई करावी, अशी मागणी मॉडर्न एज्युकेशन सोसायटीचे विश्वस्त यशवंत पुकळे यांनी केली आहे.

यासंदर्भात सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन आणि माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांच्याकडे सविस्तर निवेदन सादर करण्यात आले आहे. 

निवेदनात पोपट रामा गेजगे आणि इब्राहीम हजरत खलिफा यांच्या शिपाई पदावरील नियुक्त्या संशयास्पद असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

तक्रारीनुसार, पोपट गेजगे यांना ज्या कालावधीत शिपाई पदावर नियुक्त दाखविण्यात आले, त्याच काळात ते नियमित विद्यार्थी म्हणून शिक्षण घेत होते. त्यांची शालेय उपस्थिती जवळपास शंभर टक्के असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

 तसेच नियुक्तीच्या वेळी आवश्यक वयोमर्यादा पूर्ण झाली नव्हती, असा दावाही करण्यात आला आहे. नियुक्ती प्रस्तावात त्यांना दहावी उत्तीर्ण दाखविण्यात आले असताना प्रत्यक्षात ते शिक्षण घेत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

इब्राहीम खलिफा यांच्या नियुक्तीबाबतही तत्सम प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. नियुक्ती कालावधीत ते कनिष्ठ महाविद्यालय तसेच पदवी

 शिक्षण घेत असल्याची माहिती विविध शैक्षणिक नोंदींमधून समोर आल्याचे निवेदनात म्हटले आहे. विशेष म्हणजे, शिपाई पदावरील मान्यता कायम असतानाच त्यांना पुढे सहशिक्षक पदासाठीही मान्यता देण्यात आल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे.

या प्रकरणी यापूर्वी १८ मे २००९ रोजीही संबंधित विभागाकडे तक्रार दाखल करण्यात आली होती. मात्र, त्यावर कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्याने पुन्हा नव्याने निवेदन देण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.

दरम्यान, तत्कालीन अध्यक्ष, सचिव, मुख्याध्यापक आणि लिपिक यांनी संगनमताने शिक्षण विभागाकडे चुकीची माहिती सादर करून शासनाची दिशाभूल केल्याचा गंभीर आरोपही करण्यात आला आहे.

 यामुळे शासनाचे आर्थिक नुकसान झाल्याचा दावा करत संबंधितांवर निलंबनाची कारवाई करून नुकसानभरपाई वसूल करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

या निवेदनामुळे सांगोला तालुक्यातील शैक्षणिक व प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली असून शिक्षण विभाग या आरोपांची चौकशी करून नेमकी वस्तुस्थिती समोर आणणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

— शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज

Post a Comment

0 Comments