सांगोला धायटीतील शेतविवादाला जातीय रंग;
सहा दिवसांनंतर ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल
सांगोला | प्रतिनिधी सांगोला तालुक्यातील धायटी येथे शेतातील बांध घालण्याच्या वादातून जातिवाचक शिवीगाळ
व मारहाण झाल्याप्रकरणी अखेर सहा दिवसांनंतर सांगोला पोलीस ठाण्यात अनुसूचित जाती-जमाती
अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेत पंकज कार्तिके हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्या डोक्याला आठ टाके पडल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पंकज कार्तिके हे त्यांच्या शेतालगत असलेल्या ओढ्यातील माती काढून बांध घालत होते.
पावसाळ्यात माती वाहून जाऊ नये यासाठी हे काम सुरू असताना शेजारील शेतकरी राजेंद्र भोसले यांनी यास आक्षेप घेतला.
त्यानंतर गावातील पंच, ग्रामस्थ व गावकामगार पोलीस पाटील यांच्या उपस्थितीत पाहणी करण्यात आली.
उचललेली माती बांधासाठी वापरावी तसेच ये-जा करण्यासाठी रस्ता खुला ठेवावा, असा तोडगा काढून वाद मिटविण्याचा प्रयत्न करण्यात आला होता.
मात्र, तणाव कायम राहिल्याने राजेंद्र भोसले, लक्ष्मण भोसले आणि ओंकार भोसले यांनी घटनास्थळी येऊन पंकज कार्तिके यांना मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
तसेच जातिवाचक अपमानास्पद शब्द वापरत धमक्या दिल्याचाही आरोप फिर्यादीने केला आहे. या मारहाणीत पंकज कार्तिके गंभीर जखमी झाले.
या प्रकरणी सांगोला पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेतील विविध कलमांसह अनुसूचित
जाती-जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियमातील संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस प्रशासनाकडून सुरू आहे.
दरम्यान, या प्रकरणात गुन्हा दाखल होण्यास विलंब झाल्याचा आरोप रिपब्लिकन पक्षाचे तालुकाध्यक्ष खंडू तात्या सातपुते यांनी केला आहे.
काही प्रभावशाली राजकीय व्यक्तींकडून दबाव आणण्याचा प्रयत्न झाल्याचा दावा त्यांनी केला असून, पीडित कुटुंबाला न्याय मिळाल्याचे त्यांनी म्हटले आहे.
(टीप : संबंधित आरोप फिर्यादीच्या तक्रारीवर आधारित असून प्रकरणाचा तपास पोलीस प्रशासनाकडून सुरू आहे.)



0 Comments